पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पैसे द्याल तरच उपचार, बाळंतपणानंतर घेतले अडीच हजार रुपये.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०३/२०२२
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात सद्यस्थितीत वेगवेगळ्या घटना घडत असून आज पाचोरा ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती पाहिली तर जेथे रुग्ण उपचारासाठी येतात. त्या रुग्णालयावरच उपचाराची गरज आहे. असे दिसून येते. ग्रामीण रुग्णालयात जाऊन पाहिले असता रुग्णालयाच्या मुख्य प्रवेश व्दाराजवळच खड्डे पडलेले आहेत. तसेच जसजसे आत प्रवेश कराल तसतशी परिस्थिती बिकट दिसून येते. यात रुग्णांसाठी जे पलंग आहेत व या पलंगावर ज्या रबरी गाद्या आहेत. त्यावर धुळीचा थर दिसून येतो. व अश्याच एका पलंगावर एक वयोवृद्ध इसम उपचारासाठी टाकण्यात आला असल्याचे आढळून आले आहे.
तसेच रुग्णालयात उपचारासाठी लागणारे व उपचारादरम्यान वापरण्यात येणारे बरेचसे साहित्य धूळखात पडलेले आहे.शौचालय व मुतारीत स्वच्छता नसून घाण साचली असून दवाखान्यात दुर्गंधी पसरली आहे. ठिकठिकाणी केरकचरा, धुळ, पाण्याचे डबके दिसून येतात. तर दवाखान्याच्या बाहेर एका बाजूला स्ट्रेचर अस्ताव्यस्त पडलेले असून गप्पी मासे ठेवण्यासाठी बनवलेल्या हौदात पाणी नसल्याने गप्पी मासे नाहिसे झाले आहेत. या घाणीच्या साम्राज्यामुळे दुर्गंधी पसरली असून सोबतच डासांचा उपद्रव होत आहे.
महत्त्वाचे
या ग्रामीण रुग्णालयात रुग्ण उपचार करून घेण्यासाठी आल्यावर तेथील कर्मचारी सुरवातीला टंगळमंगळ करतात. तसेच इकडे, तिकडे जा असे सांगून उपचारासाठी टाळाटाळ केली जाते. किंवा काही कर्मचारी वैद्यकीय अधिकारी यांच्या पाश्चात उपचारासाठी पैशाची मागणी करतात अश्या तक्रारी कायमस्वरूपी ऐकायला मिळत आहेत परंतु याबाबत कुणीही लक्ष देत नसल्याचे दिवसेंदिवस हा गैरप्रकार वाढतच आहे.
आज रोजी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात भेट दिली असता या ठिकाणी बनोटी येथील एक महिला चार दिवसापूर्वी बाळंतपणासाठी आलेली आहे. या महिलेवर वेळीच उपचार होऊन संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सिझर करून संबंधित महिलेचे बाळंतपण केले. व जातांना संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी त्याठिकाणी असलेल्या परिचारीकेला पैसे घेण्यासाठी खुणावत ते निघून गेले असे महिलेने सांगितले. ऑपरेशन झाल्यानंतर बाळ, बाळंतीण सुखरूप आहेत. परंतु याठिकाणी असलेल्या दोन परिचारिका व बनोटी येथील अंगणवाडी सेविका यांनी संबंधित महिलेच्या नातेवाईकांना सतत पैशाची मागणी करत व पैसे न दिल्यास आम्ही उपचार करणार नाही तुम्ही असे लोक आहेत हे माहिती असते तर तुम्हाला इथे दाखल करून घेतले नसते अशी भाषा वापरून अडवणूक करत अडीच हजार रुपये रोख घेऊन पुढील उपचार सुरू केले असे संबंधीत महिला व तीच्या पतीने सांगितले आहे.
तसेच या ठिकाणी असलेल्या इतर दोन परिचारिका यांनी दोन, दोनशे रुपये घेतले अशी तक्रार शेख असलम हसन व आयशाबी असलम यांनी सत्यजित न्यूज कडे केली असून याची चौकशी होऊन संबंधितांवर कडक कारवाई व्हावी म्हणजे जेणेकरून शासनाने गोरगरिबांसाठी सुरू केलेले दवाखाने हे लुबाडणूकीचे केंद्र होऊ नयेत अशी मागणी होत आहे. तसेच संबंधित महिलेचे सिझर ऑपरेशन झाल्यापासून चार दिवस उलटले तरीही वैद्यकीय अधिकारी यांनी त्या महिलेची व बाळाची विचारपूस केली नसून फक्त आणि फक्त आरोग्य सेविकांच्या भरवशावर या महिलेवर उपचार सुरू आहेत.
याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला असता संबंधित अधिकारी यांची भेट होऊ शकली नाही. परंतु सदर महिलेने व तिच्या पतीने सांगितलेल्या प्रकारावरून हा प्रकार संबंधित अंगणवाडी सेविका व परिचारिका यांनी परस्पर केला असल्याचे जाणवत असल्याने या प्रकरणाशी वैद्यकीय अधिकार्यांचा काही संबंध नसावा असे वाटते. तर दुसरीकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा ग्रामीण रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचक राहिलेला दिसत नाही. ग्रामीण भागातील सर्वाधिक रुग्ण या रुग्णालयात येतात परंतु, त्यांना योग्य उपचार मिळत नसल्याने अनेकांना खाजगी दवाखान्याचा सहारा घ्यावा लागतो. विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली आहे. त्याचबरोबर औषधींचा तुटवडा जाणवत असून बंडेड पट्टी पासून अनेक औषधी उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.