वडगाव जोगे येथे ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन सात वर्षीय बालिकेचा मृत्यू.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०३/२०२४
पाचोरा तालुक्यातील वडगाव जोगे येथील कु. पुजा अनिल चव्हाण या सात वर्षांच्या मुलीचा ट्रॅक्टर खाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी अंदाजे सात वाजेच्या सुमारास घडली या घटनेमुळे वडगाव जोगे गाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की वडगाव जोगे येथील रहिवासी काशिनाथ महारु चव्हाण यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. १९ / ९७०९ घेऊन ट्रॅक्टर चालक रणजित छगन चव्हाण हा अनिल चव्हाण यांच्या घराजवळून जात असतांना आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घरासमोर अंगणात खेळत असलेल्या कु. पुजा अनिल चव्हाण अंदाजे वय वर्षं सात हिला जोरदार धडक दिली या धडकेत कु. पुजा हिच्या मानेवरुन व छातीवरुन ट्रॅक्टरचे पुढील चाक गेल्यामुळे तीचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. ही घटना घडताच वडगाव जोगे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व कु. पुजाचा मृतदेह घेऊन पाचोरा येथील नगरपालिकेच्या दवाखान्यात नेला असून पाचोरा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता वडगाव जोगे हे तांडा वस्तीचे गाव असून या गावात संपूर्ण बंजारा बांधव रहातात. आज रोजी विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी थकीत बिले वसुली करण्यासाठी वडगाव जोगे गावात गेले होते. काही विद्युत ग्राहकांनी पैसे नसल्यामुळे थकीत बिल भरण्यासाठी नकार दिला होता. म्हणून विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत खांबावर चढून बिल भरण्यासाठी असमर्थ ठरलेल्या काही विज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित केला होता.
(ट्रॅक्टर चालक व विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याचा ठपका)
हा विद्युत पुरवठा खंडित करतांना विद्युत कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनिल चव्हाण यांच्या घरासमोरील विद्युत खांबावरील पथदिव्याचा लाईट बंद झाल्याने या परिसरात अंधार पडला होता. या अंधारात अंगणात खेळत असलेली कु. पुजा ही ट्रॅक्टर चालकाच्या नजरेत न आल्यामुळे हा अपघात होऊन एका निरागस बालिकेला आपला जीव गमवावा लागला अशी माहिती समोर येत असून विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी थकीत विद्युत ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडित करतांना जर का खबरदारी घेतली असती तर विद्युत खांबावर असलेला बल्ब बंद झाला नसता व हा अपघात घडला नसता असे मत वडगाव जोगे ग्रामस्थांनी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.