एमएलजीएलच्या अधिकाऱ्यांनी काढली पळ
पाईपलाईन जोडणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना भाजपचे नगरसेवकांनी धरले धारेवर
कुडाळ
कुडाळ लक्ष्मीवाडी येथे असलेल्या महाराष्ट्र नॅचरल गॅस स्टेशनच्या जवळ पाईप जोडण्यासाठी आलेल्या एमएलजीएलच्या अधिकाऱ्यांना भाजपच्या नगरसेवकांनी धारेवर धरले. जोपर्यंत अधिकृत या स्टेशनची कागदपत्रे आणि परवानगी दिली जात नाही, तोपर्यंत पाईप लाईन जोडणी करू नये अशी मागणी केली. पोलीस बंदोबस्तात आलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणावरून पळ काढत पाईपलाईन जोडण्यासाठी खोदलेला खड्डा बुजविला.
कुडाळ नगरपंचायत क्षेत्रामध्ये लक्ष्मीवाडी येथे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड गॅस पुरवठा करण्यासाठी स्टेशन उभारले आहे. या संदर्भात स्थानिक नगरसेविका चांदणी कांबळी यांनी उपोषण केले होते. आणि या उपोषणावेळी नगरपंचायतीने स्टेशनसाठी केलेले बांधकाम हे अनधिकृत असल्याचे पत्र दिले होते. दरम्यान गॅस पुरवठा करणारे स्टेशन आणि शहरांमध्ये विस्तारित करण्यात आलेली पाईपलाईन जोडण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने प्रयत्न सुरू केले. या पाईपलाईनला जोडणीला विरोध असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये पोलीस बंदोबस्ताची मागणी केली कुडाळ पोलीस ठाण्यातून नगरपंचायतीला पत्रव्यवहार करण्यात आला यामध्ये या कंपनीला पोलीस बंदोबस्त द्यावा की नाही अशी विचारणा करण्यात आली. मात्र नगरपंचायतीने याबाबत कोणतीही परवानगी दिली नाही. असे असताना कुडाळ पोलिसांनी एमएलजीएलच्या जुन्या खोदाईबाबत असलेल्या परवानगीवर पोलीस बंदोबस्त दिला. हा पोलीस बंदोबस्त घेऊन एमएलजीएलचे अधिकारी लक्ष्मीवाडी येथे दाखल झाले.
अधिकाऱ्यांना धरले धारेवर
लक्ष्मीवाडी येथे एमएलजीएलचे अधिकारी पाईपलाईन जोडण्यासाठी आल्याचे नागरिकांकडून भाजपच्या नगरसेवकांना समजल्यावर त्या ठिकाणी भाजपचे जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, भाजप गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब, राजीव कुडाळकर, प्राजक्ता बांदेकर तसेच चंदन कांबळी, नागेश नेमळेकर, अक्षय कुडाळकर आदी नागरिक दाखल झाले. या अधिकाऱ्यांना या पाईप जोडणी संदर्भात विचारणा केली असता आम्ही नगरपंचायतीची परवानगी घेतली आहे. असे सांगितले आणि खोदाईसाठी दिलेल्या परवानगीचे पत्र दाखवले यावर मात्र भाजपचे नगरसेवक आक्रमक होऊन या खोट्या पत्रांद्वारे प्रशासनाची दिशाभूल करून पाईपलाईन जोडली जात आहे. याबाबत त्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही पाईपलाईन आम्ही फक्त तपासणीसाठी सुरू करणार आहोत. मात्र स्टेशन अद्याप सुरू करणार नाही. ही तपासणी हवेद्वारे केली जाणार आहे. असे सांगितले तसेच दरम्यान भाजपचे नगरसेवकांनी सांगितले की, जर नगरपंचायतीने परवानगी तुम्हाला दिली असेल तर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी दिलेल्या पत्रासोबत बोलवा मात्र नगरपंचायतीचा एकही कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आला नाही.
एमएलजीएलच्या अधिकाऱ्यांनी काढली पळ
या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर नगरपंचायतीने कोणत्याही प्रकारे पोलीस बंदोबस्ताच्या अहवालावर पत्र दिलेले नाही जुन्या परवानगीच्या आधारे तुम्ही पोलिसांची दिशाभूल करून ही परवानगी घेतलेली आहे. या ठिकाणी विरोध आहे हे माहित आहे आणि आमचा विरोध हा गॅस पुरवठ्याला नाही तर गॅस स्टेशनला आहे भरवस्तीमध्ये हे स्टेशन असून त्यामुळे धोका निर्माण होणार आहे. हे स्टेशन एमआयडीसी किंवा अन्य भागात हलवा ही आमची मागणी आहे. हे सांगितल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी आम्ही नगरपंचायतीमध्ये जातो असे सांगून गेले ते पुन्हा त्या ठिकाणी आले नाहीत. अखेर खड्डा खोदणाऱ्या कामगारांना तो खड्डा बुजवण्याचे आदेश भ्रमणध्वनी वरून अधिकाऱ्याने दिले.
आमचा विरोध स्टेशनला :- गटनेता विलास कुडाळकर
महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने गॅस पुरवठा करणारे स्टेशन उभारताना नगरपंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही तसेच हे स्टेशन भर वस्तीमध्ये होणार आहे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर गॅस पुरवठा होणार आहे नॅचरल गॅसचा लाभ नागरिकांना मिळावा याबाबत आमचा विरोध नाही. हे स्टेशन लोकवस्ती पासून इतर ठिकाणी स्थलांतर करावे ही आमची मागणी आहे. वाणिज्यसाठी एमआयडीसी मध्ये अनेक जागा उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी हे स्टेशन उभारून शहराला गॅस पुरवठा केला तर आमची कुठेही हरकत राहणार नाही. पण लोकवस्ती गॅस स्टेशन नको ही आमची मागणी आहे.