कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावात अवैध धंदे बोकाळले, वॉश आऊट मोहीम राबविण्याची गरज.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०३/२०२४
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. प्रकाश काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यांबाबत माहिती जाणून घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धाडसत्र राबवून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदाड व इतर गावाजवत सुरु असलेली गावठी दारुची निर्मिती व विक्री तसेच इतर अवैध धंद्यावर धाडसत्र राबवून कारवाई करण्याचा धडाका सुरु केला असल्याने सुज्ञ नागरिक, सर्वसामान्य जनता व महिला वर्गातून समाधान व्यक्त केले जात असून इतर गावांमध्ये सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी गावागावातून वॉश आऊट मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावात गावठी दारुची निर्मिती व खुलेआम विक्री सुरु असून ही दारु विक्री करणारे व्यावसायिक दारु विक्री करतांना कुणालाही न जुमानता हमरस्त्यावर, भरवस्तीत धार्मिक स्थळांजवळ, बसस्थानकाजवळ शाळा परिसरात राजरोसपणे रात्रंदिवस दारुची विक्री करत असल्यामुळे गावात अशांतता निर्माण झाली आहे. तसेच गाव परिसरात चार जुगाराचे अड्डे असून या चोवीस तास चालणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यावर दररोज लाखोंची उलाढाल होत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून दारु, सट्टा व जुगाराच्या नादात अल्पवयीन मुले व तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाऊन दररोज हजारो रुपयांचा चुराडा करत आहेत.
विशेष म्हणजे व्यसानिधिन झालेले लोक आपले व्यसन पूर्ण करण्यासाठी घरातील धन, धान्य व संसारोपयोगी वस्तू विकून सट्टा, पत्ता, जुगार तसेच दारुच्या व्यसनात खर्ची घालत असल्याने घराघरात भांडणतंटे होऊन महिलांना मारझोड करणे, महिलांच्या अंगावरील दागदागिने विकून पैसे घेऊन व्यसनाच्या नादात खर्ची घातले जात आहेत. यामुळे बरीचशी कुटुंब उद्ध्वस्त झाली असून बरीचशी कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
या कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक येथील अवैध धंद्याच्या विरोधात कुणीही आवाज उठवला तर त्याला दमदाटी करुन चुप बसवले जाते किंवा त्याच्यावर खोटे गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र रचले जाते अशीही माहिती समोर येत असून या अवैध धंदे करणारांना स्वताला प्रतिष्ठीत समजून घेणाऱ्या गावातील काही धनदांडग्यांचा छुपा पाठिंबा असून काही अवैध धंदे करणारांनी आपला व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी राजकीय पक्षाचे स्वयंघोषित कार्यकर्ते म्हणून मिरवून घेत कायद्याच्या रक्षकांवर दबाव आणून आपला हेतू साध्य करुन घेत आहेत.
म्हणून आता आचार संहिता कालावधीत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला नव्यानेच बदलून आलेले कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे मा. श्री. प्रकाश काळे साहेबांनी कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावात वॉश आऊट मोहीम हाती घेऊन धाडसत्र राबवून दोघेही गावातील सर्व प्रकारचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी सुज्ञ नागरिक व महिलांना वर्गाकडून केली जात आहे.
*******************************************************
“केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे”
सद्यस्थितीत जनहितार्थ पत्रकारिता करणे म्हणजे एकप्रकारे गुन्हा ठरत असल्याचे जाणवते यामुळे जीवावर बेतू शकते परंतु आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आम्ही मागील ३९ वर्षांपासून लेखणीच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी लिखाण करत आहोत.
कारण रामायणातील छोटासा दृष्टांत बघा भगवान हनुमंतांनी फक्त आणि फक्त शेपटी पेटवून सोन्याच्या लंकेची राख केली होती. छोट्याशा खारुताईने मातीत लोळण घेत अंगावर माती घेऊन सेतू बांधण्यासाठी मदत केली होती मग आपण तर माणूस आहोत.
*******************************************************