कु.पल्लवी जोहरे सोयगाव मधील पहिल्या महिला M.B.B.S.डॉक्टर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०६/२०२१
एक व्यक्ती सोयगाव सारख्या खेडेगावात घरची परिस्थिती बेताची असताना स्वतः शिक्षण घेते आणि पंचायत समितीत नोकरीला लागते. नोकरीनिमित्त त्याला आपली जन्मभूमी सोडावी लागते. तथापी पोटासाठी कितीही दूर गेला तरी ज्या मातीत आपण निपजतो त्या मातीची नाळ ही काही तुटत नाही. दरम्यानच्या काळात त्याला अर्धांगिनी भेटते आणि संसाररूपी गाडा सुरु होतो, काळाची गती ही अखंड चालू असते आणि त्याच्या संसाराच्या वेलीवर दोन फुले उमलतात. त्या दोन फुलांची आपल्या संस्काराने,शिकवणीने, मायेने त्यांना वैद्यकीय शिक्षणापर्यंत पोहचवतो आणि ती मुलही आपल्या वडिलांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत आपले शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करतात.
दरम्यान नोकरीचा बराच काळ निघून जातो. त्या व्यक्तीला जाणवले की आपल्या सोबत असणारे,आपल्या सारखेच आपलं स्वतःचे गाव सोडून नौकरी करणारे बरेचस्या कर्मचाऱ्यांची आपल्या जन्मभूमीची लिंक ही तुटलेली असते ती इतकी तुटलेली असते की त्यांच्या मृत्यूनंतर ही त्यांना त्या मातीत मिसळण्याचे भाग्य लागत नाही.हे बघून ती व्यक्ती व्यथित होते कदाचित आपल्यालाही असेच बाहेरच्या बाहेर ठेवले तर… या विचाराने ती व्यक्ती अस्वस्थ होते.
ती व्यक्ती मग आपल्या नुकत्याच MBBS शिक्षण पूर्ण केलेल्या मुलाजवळ सांगते की, बेटा मी नोकरीसाठी बरेच वर्षे झाली आपला गाव सोडला आहे. त्या तिथल्या मातीत मी घडली आहे. तिथेच मला आकार प्राप्त झाला आहे आणि शेवटचा श्वास घेऊन मला त्याच मातीत मिसळून जायचे आहे. आणि त्यावेळी तू मला तिथं हवा आहे.
निसर्गाचा एक नियम आहे. आपण जे पेराव तेच उगवेल. त्या नियमाने त्या व्यक्तीने आपल्या मुलांमध्ये आपले संस्कार रुजवले, आपल्या ग्रामीण भागाशी त्यांचा नाळ ही जोडलेली ठेवली. वास्तविक पाहता तो MBBS डॉक्टर मुलगा आपल्या शिक्षणाच्या व ज्ञानाच्या जोरावर त्याला पाहिजे त्या शहरात सेट झाला असता.आपले आयुष्य शहरातील भौतिक सुविधा उपभोगत एशो आरामात जगला असता. परंतु आई वडिलानी कलेल्या संस्कारामुळे व स्वतःला असणारी जनसेवेची आवड यामुळे त्याने आपल्या करिअरसाठी सोयगाव सारखे गाव निवडल.
वडिलांच्या इच्छेचा मान ठेवत मुलाने सोयगवला हॉस्पिटल टाकून रुग्णसेवा सुरू केली.सोयगावला त्याने खरोखरच रुग्णांना,गरजू लोकांना सेवा दिली. पैसा कमावणे हे त्याच्यासाठी महत्वाचे नव्हते त्याचे ते उद्दिष्ट देखील नव्हते. कालांतराने त्या मुलाचे लग्न झाले आणि त्याला जोडीदार मिळाली ती ही डॉक्टरच, त्या डॉक्टर पत्नीने आपल्या डॉक्टर पतीच्या खांद्याला खांदा लावून रुग्णांची सेवा केली. कोविडच्या या काळात त्यांनी घेतलेल्या मेहनतीने अनेकांचे प्राण व पैसा दोन्ही वाचवले. त्या डॉक्टर पत्नीने सांगितले की आम्ही शहराच्या ठिकाणी पैसा हा भरपूर कमावला असता पण या ठिकाणी जे भेटल ते त्या ठिकाणी भेटलं नसतं. ते म्हणजे आत्मिक समाधान
या काळात त्या व्यक्तीची मुलगीही MBBS उत्तीर्ण होऊन डॉक्टर बनली नुसतीच डॉक्टर नाही बनली तर तालुक्यातील पहिली महिला MBBS डॉक्टर ठरली.तो डॉक्टर मुलगा, त्याची डॉक्टर पत्नी व तो व्यक्ती यांनी ठरवलं असते तर ते कुठेही चांगल्या ठिकाणी स्थयिक झाले असते.पण गावाशी जडलेली नाळ आणि आपल्या लोकांची सेवा करण्याची इच्छा त्यांना आपल्या जन्मभूमीत परत घेऊन आली.सोयगावतील असे हे सेवाव्रत कुटुंब म्हणजे श्री सीताराम जोहरे,त्यांचा MBBS डॉक्टर मुलगा श्री मोहीत जोहरे, डॉक्टर पत्नी सौ दिपाली मोहित जोहरे व डॉक्टरांची बहीण कु.पल्लवी जोहरे…
नुकताच डॉक्टर मोहित जोहरे यांचा वाढदिवस झाला.आम्ही निवडक गावकरी मिळून एक कृतज्ञता म्हणून
अतिशयय आनंदिमय वातावरणात त्यांचा वाढदिवस साजरा केला आणि त्यांचा व त्यांच्या सेवाव्रत कुटुंबाचा छोटेखानी सत्कार केला. तसेच ईश्वराजवळ प्रार्थना केली की त्यांच्या कडून अशी निस्वार्थी सेवा सतत घडत राहो.