उद्या दारु व मांस विक्री बंदचा आदेश असल्याने, अवैध दारु विक्रेत्यांनी कसली कंबर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०१/२२४
उद्या अयोध्या नगरीत प्रभु श्रीरामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला जात असल्याने आपल्या संपूर्ण भारतात जणूकाही दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. या पवित्र विधी प्रसंगी कोणीही व कुठेही मांस विक्री तसेच मद्य विक्री करु नये असे आवाहन शासन, प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.
परंतु या आदेशाची पायमल्ली करत पाचोरा, जामनेर तालुक्यातील अवैध दारु विक्रेत्यांनी आजच मान्यताप्राप्त देशी, विदेशी दारुच्या दुकानातून मोठ्याप्रमाणात देशी व विदेशी दारुची खरेदी केली आहे.
तसेच गावठी दारु निर्मिती करुन कॅन चे कॅन भरुन ठेवले असून उद्या दारु विक्री करुन पैसे कमावण्यासाठी कंबर कसली असल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूजच्या हाती आले आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदाड, पिंपळगाव हरेश्वर, वरखेडी, वडगाव आंबे, वडगाव आंबे खुर्द, वडगाव आंबे बुद्रुक, कुऱ्हाड, कोल्हे, लोहारा, लोहारी या गावातील कायमस्वरूपी अवैध दारु विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी तसेच हॉटेल, पानटपरी व ढाबा चालकांनी खोकेच्या, खोके दारु खरेदी करुन योग्य लोकांच्या मदतीने त्यांना योग्य वाटेल अशा सुरक्षित ठिकाणी साठवणूक करुन ठेवली असून उद्या एकप्रकारे ड्राय डे या दिवशी जास्त दराने दारुची विक्री करुन अमाप पैसा कमावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाचे ~
अधिकृत देशी व विदेशी दारुच्या दुकानातून सर्व नियम व अटी धाब्यावर बसवून या अवैध दारु विक्रेत्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात दारु दिलीच कशी असा प्रश्न सुज्ञ नागरिकांनी उपस्थित करत उद्या या अवैध दारु विक्रेत्यांवर कठोरात, कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.