कुऱ्हाड येथील अवैधधंदे करणारे एक पाऊल पुढे, भ्रमणध्वनीवर घेतले जातात मटक्याचे आकडे.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/१०/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड गावात सट्टा, पत्ता, जुगार, गावठी व देशी दारुची विक्री सह अवैधधंदे राजरोसपणे मोठ्या प्रमाणात सुरु होते. म्हणून कुऱ्हाड गावच्या महिला व पुरुषांनी याबाबत नाराजी व्यक्त करत हे अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत म्हणून पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला कळवले होते. तसेच अवैधधंदे विरोधात आवाज उठवण्यासाठी सत्यजीत न्यूजकडे गाऱ्हाणे मांडले होते.
याची दखल घेत सत्यजीत न्यूजच्या माध्यमातून याबद्दल आवाज उठवण्यात आला होता. कुऱ्हाड ग्रामस्थांच्या तक्रारीची व सत्यजीत न्यूजच्या बातमीची दखल घेत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. कृष्णा भोये व त्यांच्या सहकाऱ्यांनी सतत धाडसत्र राबवून अवैधधंदे करणारांना सळो की पळो करुन सोडले होते.
या पोलिस कारवाईने दिवसाढवळ्या चालणारे अवैधधंदे बंद झाल्याने ग्रामस्थांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले होते. परंतु आता अवैधधंदे करणारांनी नामी शक्कल लढवली असून भ्रमणध्वनीवर (मोबाईल) व्दारे मटक्याचे (सट्याचे) आकडे घेणास सुरुवात केली असून गल्लीबोळात फिरुन चालता, फिरता सट्टा बेटिंगचा फंडा सुरु केला आहे.
तसेच गावठी व देशी दारुची अवैधरित्या विक्री करणारेही भ्रमणध्वनीवर संधान साधून घरपोच गावठी दारुचा फुगा किंवा देशी दारूच्या बाटल्या विकत असल्याचे बोलले जात आहे. म्हणून अवैधधंदे करणारे एक पाऊल पूढे आहेत असे बोलले जात आहे.