दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१०/२०२२

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील शेतकरी व नांद्रा गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष त्र्यंबक बाविस्कर यांची नांद्रा ते पहाण रस्त्यालगत गट नंबर १४७ ही शेतजमीन आहे. याच शेतात त्यांनी शेती अवजारे व पिकविलेला शेतीमाल ठेवण्यासाठी पत्र्याचे गोडाऊन बांधले आहे. याच गोडाऊन मध्ये त्यांनी स्वताच्या शेतातील पिकवलेला अंदाजे विस क्विंटल कापूस भरुन ठेवला होता. सुभाष बाविस्कर हे सकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत शेतातच रहात असत नंतर ते घरी जात असत याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दिनांक १५ ऑक्टोबर शनिवार मध्यरात्री ते १६ ऑक्टोबर रविवार सकाळपर्यंत अंदाजे १८ क्विंटल कापूस चोरुन नेल्याची बाब सुभाष बाविस्कर हे १६ ऑक्टोबर रविवार सकाळी सहा वाजता शेतात गेल्यानंतर गोडाऊन जवळ बाहेर कापूस पडलेला व कुलुप तुटलेले दिसल्यावर लक्षात आला आहे.

कापूस चोरीला गेल्याचे दिसून येताच सुभाष बाविस्कर यांना धक्का बसला व ते जागेवरच भोवळ येऊन खाली बसले थोड्या वेळाने स्वताला सावरत त्यांनी कापूस चोरीला गेल्याचे घरच्यांना व गावातील लोकांना कळवले ही वार्ता गावात माहीत पडताच गावकऱ्यांनी सुभाष बाविस्कर यांच्या शेताकडे धाव घेऊन घडलेला प्रकार पाहून संतप्त प्रतिक्रिया देत सुभाष बाविस्कर यांना धिर देत गावात आणले नंतर पोलीस स्टेशनला जाऊन अज्ञात चोरट्यांविरोधात रितसर तक्रार दाखल केली आहे.

सुभाष बाविस्कर यांच्या या गोडाऊन मधून या अगोदरही पाण्याची इलेक्ट्रीक मोटार, पिटर मशिन, शेती अवजारे चोरी गेल्याची घटना घडली होती. तसेच नांद्रा शिवारात गुरे चोरी, शेती अवजारे चोरी व इतर साहित्य चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत व आजही घडत आहेत मात्र आजपर्यंत चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले नसल्याने दिवसेंदिवस चोरट्यांची हिंमत वाढली असून चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने या पंचक्रोशीतील गावागावातून शेतकरी भयभीत झाले आहेत.

शेतीमालाच्या व पशुधनाच्या चोऱ्या थांबवण्यासाठी आता गावागावातून ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याची गरज असुन पुर्वी प्रमाणे गावोगावी ठेंगे सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाचे रक्षण करणे गरजेचे झाले आहे. असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.