पाचोरा ते शेंदुर्णी रस्त्यावर मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांचा धिंगाणा, मोठ्या अपघाताची शक्यता.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०१/२०२४
पाचोरा ते शेंदुर्णी रस्त्यावर मद्यपान करुन वाहने चालवणारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे दिसून येत असून हे मद्यपी दारुच्या नशेत आपली वाहने नागमोडी वळणे घेत भरधाव वेगाने पळवत असल्याने या रस्त्यावर एखाद्यावेळेस मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता अशी माहिती समोर येत आहे की, पाचोरा ते शेंदुर्णी रस्त्यावर पाचोरा शहरातील जारगाव चौफुली, भारत डेअरी स्टॉप तसेच लोहारी बसस्थानक, वरखेडी बसस्थानक, वडगाव आंबे तसेच या रस्त्यावर असलेल्या अनाधिकृत ढाब्यांवर अनाधिकृतपणे गावठी व देशी दारुची विनापरवाना अवैध विक्री केली जात आहे. हे अनाधिकृत, अवैध दारु विक्रेते चोवीस तास दारु विक्री करत असल्यामुळे या रस्त्यावरुन जाणारे, येणारे दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनधारक चालक हे भररस्त्यात, चौकाचौकात आपली वाहने उभी करुन खुलेआम दारु पिऊन आपली वाहने पळवतात.
तसेच प्रमाणापेक्षा जास्त दारु पिऊन वाहन चालवतांना त्यांचा वाहानावरील ताब सुटतो व ते नागमोडी वळण घेत आपली वाहने पळवतात यात विशेष करुन दुचाकीस्वार हे हातात दारुच्या बाटल्या घेऊन दुचाकी चालवतांना मुद्दामहून जोरजोराने ओरडत भरधाव वेगाने नागमोडी वळणे घेत स्टंटबाजी करुन गोंधळ घालत असतात. यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या, येणाऱ्या सभ्य महिला, पुरुष पादचाऱ्यांना तसेच शाळकरी मुलांना रस्त्यावरुन चालतांना आपला जीव मुठीत घेऊन या वाहनांचा सामना करत रस्त्यावरुन चालावे लागते आहे. एखाद्यावेळी या मद्यपान करुन वाहनचालकांच्या वाहनाचा धक्का लागून दररोज वाद होतात किंवा एखाद्यावेळी लहान, मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागत असून हा प्रकार असाच सुरु राहिल्यास एखाद्यावेळी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणून संबंधित पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी पाचोरा ते शेंदुर्णी दरम्यान भररस्त्यावर सुरु असलेली अवैध दारुची विक्री बंद करुन वाहनचालकांची तपासणी करुन दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन धारकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पाचोरा, लोहारी, वरखेडी, वडगाव आंबे, मालखेडा, शेंदुर्णी येथील ग्रामस्थांनी केली आहे.