अंबे माता दृष्ट प्रवृतींचा नाश कर, श्री. गो. से. हायस्कूलच्या कांतायन सरांचा चित्र संदेश.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/१०/२०२३
हिंदू संस्कृतीमध्ये नवरात्री हा उत्सव दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या उत्सवात दुर्गा मातेने भक्तांच्या व मानवजातीच्या रक्षणासाठी जी विविध नऊ रुपे घेऊन नऊ शक्तींच्या बळावर दानवांचा संहार केला अश्या दुर्गा मातेच्या सन्मानार्थ हा नवरात्रोत्सव साजरा करुन नवीन पिढी समोर पावित्र्य, चारित्र्य, धर्मभावना जागृत करण्यासाठी एक आदर्श निर्माण केला जातो.
याच नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूल या नामांकित शिक्षण संस्थेचे कलाशिक्षक सुबोध कांतायन यांनी शाळेच्या दर्शनी फलकावर दुर्गा मातेचे मनमोहक रुप चित्रातून साकारले आहे. या चित्रातील अंबेचे रुप पाहिल्यावर प्रत्येक स्त्रीच्या मनात एक नवीन उर्जा निर्माण होते असे हे बोलके मनमोहक चित्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. यामागील कारण म्हणजे सुबोध कांतायन यांनी साकारलेल्या चित्रात भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अत्याचार झालेली निरागस बालिका देवी मातेला शरण आली असून माते तु पुन्हा अवतार घे व या भुतलावरील अत्याचारी, दृष्टांचा तुझ्या प्रकोपापातून नाश कर अस मागण मागतेय अश्या पध्दतीने हे चित्र साकारण्यात आले आहे.
याबाबत सुबोध कांतायन यांच्याशी संवाद साधला असता आजच्या परिस्थितीत महिलांकडे एक उपभोगाचे साधन म्हणून बघण्याची दृष्ट मानसिकता दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने महिला व मुलींवरील अत्याचार व लैंगिक शोषणाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. म्हणून महिलांनी जर योग्य वेळी या राक्षसी वृत्तीचा विरोध केला तर भविष्यात नक्कीच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी होईल या दृष्टिकोनातून मी देवीची नऊ रुपे सादर करुन महिलांना त्यांच्या शक्तीची जाणीव करुन देण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे सांगितले. तसेच महिलांनी आपल्या मुलींची काळजी घेतली पाहिजे हा संदेश देण्यासाठी मुलीला कुणाचीही नजर (दृष्ट) लागू नये म्हणून मुलीच्या पायात काळा दोरा बांधून आईला तीच्या जबाबदारीची जाणीव करुन देण्यासाठी हा एक छोटासा मार्मिक संदेश देण्यासाठीचा प्रयत्न केला आहे.
सुबोध कांतायन हे चांगले कलाशिक्षक असून त्यांनी जनजागृती व सर्वसामान्य जनतेच्या ज्ञानात भर पडावी म्हणून आजपर्यंत वऱ्याचशा चित्रकृती साकरल्या आहेत. यात चंद्रयान मोहीम, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित चित्र तसेच व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलनाचे संदेश देणारे चित्र, जातीय सलोखा अश्या विविध चित्रांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी काम केले आहे.
या त्यांच्या उपक्रमाला पी. टी. सी.संस्थेचे चेअरमन संजयजी वाघ, संस्थेचे व्हा. चेअरमन मा. नानासो श्री. व्ही. टी. जोशी, शालेय समिती चेअरमन मा. दादासो श्री. खलील देशमुख, संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा. भोलाआप्पा श्री. सतीष चौधरी, शाळेचे माजी पर्यवेक्षक श्री. शांताराम चौधरी सर, श्री. बी. एस. पाटील आप्पा या मान्यवरांनी संदेशपूर्ण चित्र रेखांकित केल्याबददल सरांच्या कलेचे कौतुक व शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम.वाघ मॅडम,उपमुख्याध्यापक श्री.एन. आर.ठाकरे सर,पर्यवेक्षक श्री. आर.एल. पाटील सर,श्री.ए.बी.अहिरे सर, सौ.ए.आर.गोहिल मॅडम, तांत्रिक विभाग प्रमुख श्री.एस.एन.पाटील सर,किमान कौशल्य विभाग प्रमुख श्री. मनीष सर,कार्यालयीन प्रमुख श्री.अजय सिनकर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.