अंबे वडगाव येथे उद्या श्री. अंबिका मातेचा यात्रा उत्सव.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०३/२०२३
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री. अंबिका मातेचा यात्रोत्सव सालाबादप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा केला जातो या वर्षीही श्री. अंबिका मातेचा यात्रोत्सवात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक, भक्तांनी या यात्रोत्सवात मोठ्या संख्येने येऊन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन अंबे वडगाव ग्रामस्थांनी केले आहे.
या यात्रा उत्सव निमित्ताने सकाळी साडेपाच वाजता ध्वज सजावट, ध्वज पूजन व श्री. अंबिका मातेला नवीन वस्त्र व साज चढवून आरती करण्यात येणार आहे. तदनंतर दुपारी बारा वाजता श्री. अंबिका मातेला नैवद्य व आरती, दुपारी चार वाजता गावातून तगतराव मिरवणूक व लगेचच ग्रामपंचायत पटांगणात बारा गाड्या ओढून श्री. अंबिका मातेच्या मंदिरासमोर तमाशा कलावंतांच्या हजेरीचा कार्यक्रम होणार आहे.
रात्री दहा वाजेपासून लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार असून दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल ठेवण्यात आली आहे. पाचव्या दिवशी सकाळी अकरा वाजेपासून चार वाजेपर्यंत शंकर पट (बैलगाडा शरू) ठेवण्यात आली असून या करीता जास्तीत, जास्त स्पर्धकांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सायंकाळी पाच वाजता दहिहंडी नंतर यात्रोत्सवाच्या खर्चाचा लेखाजोखा वाचून यात्रोत्सवाची सांगता करण्यात येणार आहे.