डेंग्यूची लागण झालेल्या पाचोरा शहरातील २२ वर्षीय तरुणीवर काळाचा घाला, नगरपरिषदेच्या कारभारा बाबत नागरिक संतप्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१०/२०२३
नुकताच पावसाळा संपला असला तरी सद्यस्थितीत सगळीकडे ठिकठिकाणी पाण्याचे डबके, सांडपाण्याच्या गटारीची दुरावस्था तसेच शहर असो खेडेगावात नियमितपणे साफसफाई केली जात नसल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने सर्वसामान्य जनतेला विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. यातच डेंग्यूचे डास मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने शहर व गावपातळीवर डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून डेंग्यू आजाराची लागण झाल्याने काहींनी आपला जीव गमावला आहे.
याचे जीवंत उदाहरण म्हणजे पाचोरा शहरातील नामांकित तावरे कन्या विद्यालयाचे उपशिक्षक शांताराम पाटील यांची मुलगी चेतना वय वर्षे २२ हिचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की चेतना पाटील ह्या आजारी पडल्यानंतर त्यांना पाचोरा शहरातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र या तीन दिवसांच्या सतत उपचारादरम्यान चेतना हीची प्रकृती कमालीची खालावली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच चेतना हीला पुढील उपचारासाठी जळगाव हलवण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान दिनांक १४ ऑक्टोंबर २०२३ शनिवार रोजी चेतना हीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना माहीत पडताच पाचोरा शहरासह तीच्या मुळगावी चिंचखेडा येथे शोककळा पसरली होती.
या घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता सद्यस्थितीत पाचोरा नगरपरिषदेवर प्रशासकीय राजवट असून ढिसाळ कारभारामुळे पाचोरा शहरातील साफसफाई वेळेवर केली जात नसल्याचे तसेच नैसर्गिक बदलानुसार वेळोवेळी साफसफाई व जंतुनाशक फवारण्या केल्या जात नसल्याने पाचोरा शहरात दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे बोलले जात आहे. तसेच चेतना ही आजारी पडल्यानंतर ज्या खाजगी डॉक्टरकडे तीच्यावर उपचार सुरु होते त्या खाजगी डॉक्टरकने योग्य वेळी योग्य तपासण्या न करता उपचारासाठी हलगर्जीपणा केला व यातच प्रकृती खालावल्याने चेतनाला आपला जीव गमवावा लागला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
नगरपरिषदेच्या गलथान कारभाराबाबत नागरिक संतप्त.
—————————————————————-
पाचोरा नगरपरिषदेवर प्रशासकीय अधिकारी असुन नसल्यासारख्या असल्याचा आरोप करत पाचोरा शहरात नियमितपणे साफसफाई व औषध फवारणी करण्यात यावी तसेच डेंग्यू आजारापासून जनतेला वाचवण्यासाठी जनजागृती करण्यात यावी अशी जोरदार मागणी पाचोरा शहरवासीयांनी केली असून डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले पाहिजेत अशी मागणी केली आहे.
ग्रामीण भागातही डेंग्यू सक्रिय.
डेंग्यू आजाराने हिरावला घरचा कुलदीपक, कोल्हे येथील तडवी कुटुंबावर काळाचा घाला. https://satyajeetnews.com/23221/