पाचोरा भडगाव शहरातील अतिक्रमित घरे नियमानाकुल करण्याच्या प्रक्रिया तातडीने पूर्ण करा,आमदार किशोर अप्पा पाटील यांचे प्रशासनास आदेश.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०१/२०२२
शासन निर्णयाप्रमाणे सन २०११ पूर्वीचे पाचोरा व भडगाव शहरातील अतिक्रमित घरे नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती आली असून पाचोरा शहरातील सुमारे साडेतीन हजार तर भडगाव शहरातील सुमारे तीनहजार अतिक्रमीत धारकांना याचा लाभ मिळणार असुन पाचोरा, भडगाव तालुक्यातील अतिक्रमीत धारकांना हक्काचे घर मिळणार असल्याने आमदारांनी दिलेली ही एक मोठी संक्रात भेटच दिली असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
याबाबत दिनांक १४ जानेवारी २०२२ शुक्रवार रोजी दुपारी १२ वाजता प्रांताधिकारी साहेब यांचे अध्यक्षतेखाली कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत मोजणी प्रक्रिया पूर्ण करणेकामी दोन्ही पालिकांनी तातडीने मोजणी रक्कम भरावी तसेच भूमिअभिलेख कार्यालयाने देखील तातडीने मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
या वेळी आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांच्यावतीने स्वीय सहाय्यक राजेश पाटील यांनी बैठकीत सहभाग घेतला.
बैठकीला प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल , पाचोरा तालूका भूमिअभिलेख अधिकारी आर.एस.घेटे, भडगाव तालूका भूमिअभिलेख अधिकारी सय्यद यांचे सह पाचोरा मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, नगररचना विभागाच्या मानसी भदाणे, बांधकाम विभागाचे प्रकाश पवार, पाचोरा नायब तहसीलदार संभाजी पाटील, भडगाव येथून नायब तहसिलदार देवकर,बांधकाम विभागाचे नितीन पाटील आदींची उपस्थिती होती.
बैठकीत पाचोरा शहरातील घरांसाठी आकारलेली सुमारे ९० लक्ष मोजणी फी शासनाकडून कमी करून आता ४५ लक्ष रुपये पाचोरा पालिकेने तातडीने भरण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ बांदल यांनी दिले असून आगामी महिन्याभरात मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्धिष्ट देण्यात आले असून भडगाव पालिकेला देखील प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेशीत करण्यात आले आहे.
दरम्यान पालिकेने मोजणी फी भरल्यानंतर तातडीने ईटीएस मशिनद्वारे मोजणी प्रक्रिया राबवली जाईल तसेच गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वापरून लवकरात लवकर आम्ही प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची प्रतिक्रिया पाचोरा भूमीलेख अधिकारी एस.आर.घेटे. यांनी दिली आहे.यामुळे अतिक्रमण धारकांचे आपल्या हक्काचे घर आता नावावर होणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे.