अंबे वडगाव परिसरात तो आला म्हणजे ती जाते, विद्यूत वितरण कंपनीचा गलथान कारभार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०६/२०२४
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, कोकडी तांडा व वडगाव जोगे या गावांमध्ये विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने या पाचही गावातील विद्युत ग्राहक कमालीचे हैराण झाले आहेत.
(तो (पाऊस) आला म्हणजे ती (विद्युत) जाते)
याबाबत सविस्तर वृत्त असे की अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, वडगाव जोगे व कोकडी तांडा या पाचही गावांसाठी कुऱ्हाड येथील ३३ के. व्हि. उपकेंद्रावरुन विद्युत पुरवठा केला जातो. परंतु थोडीशी हवा (वादळ) किंवा पाऊस आला तरीही विद्युत वाहिन्यांमध्ये घर्षण होऊन जोरदार आवाज होतो म्हणजे (शॉट सर्किट) होऊन क्षणार्धात विद्युत पुरवठा तासंतास खंडित होतो. या मागील विशेष म्हणजे या गावांसाठी विद्युत वितरण कंपनीने नेमुन दिलेले वायरमन, विद्युत सहाय्यक या गावात रहात नसून ते बाहेरगावी रहातात. व जेव्हा काही तांत्रिक बिघाड झाल्यास गावातील काही (अप्रशिक्षित) गुर, ढोरं चालणाऱ्या मुलांना हाताशी धरून भ्रमणध्वनीवर संपर्क साधून झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी सांगुन वेळ काढून नेतात.
या वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे व शॉट सर्किटमुळे विद्युत ग्राहकांच्या घरातील ट्यूब लाईट, लाईट, फ्रिज, पंखे, मोबाईल चार्जर हे जळुन खाक होत आहेत. तसेच तासंतास विद्युत पुरवठा खंडित रहात असल्याने घरातील पंखे बंद होतात व रात्रीच्या वेळी डासांचा उपद्रव सहन करावा लागतो. या डासांमुळे शेतातून काम करुन थकून, भागून आलेला शेतकरी, शेतमजूर व लहान मुलांना रात्र, रात्र जागून काढावी लागते. तसेच डास, मच्छर चावल्यानंतर अनेक आजारांना सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे विद्युत पुरवठा खंडित झाला की पिठाच्या गिरण्या बंद होतात व गोरगरिबांच्या घरातील पिठ संपल्याने त्यांना उपवासी पोटी राहून दिवस काढावा लागत असल्याची बाब समोर येत आहे.
तरी विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंबे वडगाव येथे नेमुन दिलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयात रहाण्यासाठी सूचना देऊन मुख्यालयाच्या गावातच रहाण्यासाठी भाग पाडावे. तसेच कुऱ्हाड येथील उपकेंद्रापासून तर वरील पाचही गावातील विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती व देखभाल करुन लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिनीच्या तारा ओढून व्यवस्थीत करून जिर्ण झालेल्या तारा बदलवून ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती तसेच कटाउट बॉक्स दुरुस्ती त्वरित करावी अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.
क्रमशः
पुढील बातमी
विद्युत वितरणच्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यासाठी अंबे वडगाव सरपंचांनी मासिक मीटिंगमध्ये केला ठराव.