आणखी एका पत्रकाराचा कोरोनाने घेतला बळी, देशोन्नतीचे बोदवडचे पत्रकार प्रकाश चौधरी यांचे निधन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०४/२०२१
जळगाव- दैनिक देशोन्नती चे बोदवड येथील पत्रकार प्रकाश वसंत चौधरी (वय ५३)यांचा आज कोरोनामुळे जामनेर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. आज ती संपली. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली जावई असा परिवार आहे.
त्यांच्या मृत्यूमुळे पत्रकारांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या परिवाराला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी बोदवड परिसरातील पत्रकारांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून चौधरी देशोन्नतीचे पत्रकार म्हणून काम करीत होते. बोदवड परिसरातील अनेक विषयांवर त्यांनी लेखन केले होते.
*पत्रकारांना लसीकरण कधी -मनोज बारी *
फ्रंट वर्कर असूनही अद्यापही जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना लसीकरण सुरू झालेले नाही. याविषयी प्रत्येक दैनिकाकडून याद्या मागवण्यात आल्या. मात्र त्याविषयी कोणीही बोलण्यास तयार नाही. दोन-तीन वेळा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केवळ आश्वासनेच दिली आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत लवकरच लसीकरण केले जाईल, असेही सांगण्यात आले होते. मध्यंतरी काही ज्येष्ठ पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र अद्यापही लसीकरण सुरू झालेले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पत्रकारांना लसीकरण केले जाईल, असेही सांगितले गेले होते, मात्र तो विषयी देखील बाजूला पडला आहे. कोणत्याही अडीअडचणीच्या व प्रसिद्धीच्या ठिकाणी पत्रकारांना तातडीने बोलवले जाते, मात्र लसीकरणासाठी का बोलावले जात नाही? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात जवळपास आठ ते दहा पत्रकारांचे बळी गेले असून आणखी प्रशासन किती वाट पाहणार? मुंबई, पुणे, नागपूर, अकोला आदी भागात पत्रकारांना प्राधान्याने लसीकरण करण्यात आले, मग जळगाव जिल्ह्यात का नाही? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.