कुऱ्हाड खुर्द शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार, गरीब शेतकऱ्याचे बारा हजार रुपयांचे नुकसान.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०३/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द शिवारातील कळमसरा, मालखेडा राखीव जंगल परिसरातील भैरवनाथ बाबा शिवारात राजू सखाराम राठोड यांच्या मालकीची गट क्रमांक १११/०४ शेतजमीन आहे. याच शेतात त्यांनी आपली पाळीव जनावरे बांधण्यासाठी व्यवस्था केलेली असून या खळ्या ते आपली जनावरे बांधतात. दिनांक २४ मार्च २०२२ गुरुवार रोजी नियमित प्रमाणे राजू राठोड यांनी आपली गुरे खळ्यावर बांधून घराकडे निघून आले.
परंतु दिनांक २५ मार्च २०२२ शुक्रवार रोजी सकाळी राजु राठोड हे गुरांना चारापाणी करण्यासाठी पुन्हा शेतातील खळ्यावर गेल असता त्यांना तेथे सात महिन्याचे वासरू जखमी व मृतावस्थेत आढळून आले. जवळ जाऊन पाहिले असता कोणत्यातरी जंगली श्वापदाने वासरावर हल्ला चढवून शिकार करत पोट फाडले असल्याचे दिसून आले आहे.
राजु राठोड यांची शेती कळमसरा, मालखेडा राखीव जंगलाजवळ आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना कधी बिबट्या तर कधी वाघाचे दर्शन होणे नित्याचाच प्रकार सुरू असून या परिसरातील शेतकरी भयभीत झाला आहे. याबाबत वनविभागाला वारंवार कळवल्यावरही वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी लक्ष देत नसून याबाबत निष्काळजीपणा दाखवत आहेत. संबंधित शिवारातील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आमचे म्हणणे ऐकून घेत नसल्याचे शेतकरी सांगतात. वन विभागाच्या या मनमानी कारभारामुळे एखाद्यावेळेस जीवितहानी होऊ शकते अशी भीती व्यक्त करत परिसरातील शेतकऱ्यांनी विभागाबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
महत्त्वाचे
कळमसरा व मालखेडा राखीव जंगलात काही वीरप्पनच्या पिल्लावळीने धुमाकूळ घातला असल्याने दिवसाढवळ्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल होत आहे. तसेच या राखीव जंगलात या लाकूडतोड्यांचा संचार वाढल्यामुळे जंगलातील प्राणी शेत शिवारात व मानववस्तीकडे पळ काढत असल्यामुळे या घटना घडत असल्याचे सांगितले जाते. तसेच
राखीव जंगलात वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने हे जंगली श्वापदे पाण्याच्या शोधत भरकटून सैरावैरा फिरत आहेत. तसेच या राखीव जंगलाभोवती सीमारेषा (खोल चारी) खोदलेली नसल्याने जंगलातील प्राण्यांना जंगलाबाहेर निघणे सोपे जात असल्याने ते जास्तीत जास्त जंगला बाहेर पळत आहेत. म्हणून राखीव जंगलाच्या चारही बाजूने सीमारेषा आखून खोल चारी खोदल्यास जंगलातील जनावरे गावाकडे येणार नाहीत व गावातील गुरे राखीव जंगलात जाणार नाहीत असे जनतेचे म्हणणे आहे.
पुढील बातमी
वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी वागतात तोऱ्यात, सर्वसामान्य जनता व राखीव जंगल ८४ च्या फेऱ्यात.