एक अधिकारी घेतो हप्ते तर दुसरा करतो कारवाई, मस्तावलेले अवैध धंदेवाईक करतात अधिकाऱ्यांसोबत हातापायी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०१/२०२४
पाचोरा तालुक्यातील गाव खेड्यापाड्यातील हॉटेल, पानटपरी, ढाबा व गावागावात भर वस्तीत अंगणवाडी, मराठी मुलांच्या शाळा इतर शैक्षणिक संस्था व धार्मिक स्थळांजवळ मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मोठ्या प्रमाणात गावठी, देशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे. याबाबत वारंवार आवाज उठवून सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी म्हणजेच दारूबंदी विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने हे व्यवसाय दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.
यामागील विशेष कारण म्हणजे या व्यवसायिकांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (काही) अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस विभागाचे (काही) जबाबदार लोक दर महिन्याला ठराविक रक्कम (हप्ते) रूपाने घेत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून “एक अधिकारी हप्ते घेतो तर दुसरा अधिकारी कारवाई करतो” याच रागातून दिनांक २६ जानेवारी २०२४ शुक्रवार रोजी दुपारी पावणे पाच वाजता कारवाई करण्यासाठी आलेल्या भरारी पथकावर एका अवैध दारू विक्रेत्या हॉटेल व्यावसायिकाने रागाच्या भरात हल्ला चढवल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सगळीकडे दिरुबंदीचा आदेश असतांनाही पाचोरा ते जळगाव रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये अवैध दारु विक्री सुरु असल्याच्या गुप्त माहितीवरून व संशयावरून राज्य उत्पादन शुल्क जळगाव विभागाच्या भरारी पथकाने दुय्यम निरीक्षक योगेश यशवंत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी अडीच वाजता धाडसत्र राबवून एका हॉलमध्ये झाडाझडती घेतली असता संबंधित हॉटेलमध्ये मध्ये मद्यसाठा व मद्यविक्री करतांना आढळून आल्याने हॉटेल मालकावर दारुबंदी कायद्यानुसार कारवाई केली होती.
या झालेल्या कारवाईबाबत संबंधित हॉटेलच्या मालकाने मनात राग ठेवत भरारी पथक पुढील कारवाई करणे कामी वाडी, शेवाळे येथील ॲक्वा वाटर फिल्टर जवळ रस्त्यावर उभे असतांनाच ललित पाटील यांनी त्या ठिकाणी येऊन कारवाई करणारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी योगेश यशवंत सुर्यवंशी यांच्याशी हुज्जत घालत माझ्यावर केलेली कारवाई मागे घ्या नाहीतर तुम्हाला महागात पडेल अशी दमदाटी करुन धमकावले व चापटा, बुक्क्यांनी मारहाण करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक अधिकारी योगेश यशवंत सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित हॉटेलच्या मालकाविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर २१/२०२४ आय. पी. सी. कलम ३५३, ३३२ नुसार रात्री नऊ वाजून एक्के चाळीस मिनिटे वाजता रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रजी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहेत.
सविस्तर वृत्त:-
पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यातील वाडावस्तींवर, भरवस्तीत तसेच रस्त्यावर असलेल्या हॉटेल, पानटपरी, ढाबा, काही किरणा दुकानातून मोठ्या प्रमाणात गावठी व देशी, विदेशी दारुची अवैध रित्या अनाधिकृतपणे खुलेआम विक्री केली जात आहे. यामागील कारण म्हणजे या अवैध दारु विक्रेत्यांना स्थानिक तसेच तालुक्यातील काही स्वताला स्वयंघोषित कार्यकर्ते, समाजसेवक म्हणून मिरवून घेणारे लोक यांच्या पाठीशी असल्याकारणाने या दिवसाढवळ्या अवैध धंदे करणारांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालली असून याचाच फायदा घेत राज उत्पादन शुल्क विभागाचे (काही) अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस विभागातील (काही) अधिकारी व कर्मचारी हे हप्ते घेत असल्याचे अवैध धंदे करणारे राजरोसपणे जनमानसात चर्चेअंती सांगत असतात.
तसेच पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यातील, वाडावस्तींवर भरवस्तीत तसेच रस्त्यावर असलेल्या हॉटेल, टपरी व ढाब्यांवर आजही मोठ्या प्रमाणात अवैध रित्या गावठी व देशी, विदेशी दारुची खुलेआम विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे याठिकाणी विकली जाणारी दारु ही काही प्रमाणात बनावट असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. अशा अवैध दारु विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीकांशी काही कायद्याच्या रक्षकांची गट्टी जमली असल्याने काही अवैध दारुचे धंदे करणारे लोक आपापला व्यवसाय वाढीस लागावा म्हणून काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन एकमेकांवर धाडसत्र राबवून आपल्या प्रतिस्पर्धी व्यवसायीकाचे पाय मागे खेचण्यासाठी एकप्रकारे (सुपारीच) देतात अशी माहिती एका अवैध दारु विक्रेत्यांने सततच्या कारवाईला वैतागून नाव न सांगण्याच्या अटीवर सत्यजित न्यूज कडे कथन केले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस विभागातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांचे व अवैध धंदे करणारांचे अर्थपूर्ण जवळचे संबंध असल्याकारणाने या विभागातील इमानेइतबारे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हे मस्तावलेले अवैध धंदे करणारे असा अकस्मात जीवघेणा हल्ला करतात यामुळे इमानेइतबारे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मानसिकतेचे खच्चीकरण होत आहे.