दिवसाढवळ्या पोत्याने गुटका विकणाऱ्या लोहारा येथील गुटका किंग वर कारवाई कधी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०३/२०२४
सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरु असल्याने गावागावातून शाळा, प्राथमिक विद्यामंदिरात, कॉलेज, बसस्थानक, धर्मस्थळे व सार्वजनिक ठिकाणी गुटख्याची खुलेआम विक्री केली जात असल्याचे दिसून येते. मागील काळात मा. श्री. एकनाथराव खडसे साहेबांनी या सुरु असलेल्या गुटख्याच्या अवैध व्यवसायाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत अन्न व औषध प्रशासन, पोलीस व यांना पाठीशी घालणारांचा खरपूस समाचार घेतला होता. तेव्हा मुक्ताईनगर सह बऱ्याचशा ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलीसांनी मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्यावर कारवाई केली होती व आजही काही प्रमाणात कारवाया सुरु आहेत. मात्र आजही पाचोरा, नगरदेवळा, जामनेर, शेंदुर्णी, नांद्रा व विशेष करुन लोहारा गाव परिसरात आजही राजरोसपणे किरकोळ व होलसेल गुटखा विक्री सुरु आहे.
हा तंबाखू युक्त प्रतिबंधित गुटखा अवैध मार्गाने मिळत असला तरी गावागावातून याची दिवसाढवळ्या, राजरोसपणे विक्री सुरु आहे. यामुळे अल्पवयीन मुले, तरुण मुले, जेष्ठ नागरिक व महिला, मुलीही या गुटख्याच्या आहारी गेल्या आहेत. यामुळे भविष्यात घराघरात कॅन्सर सारख्या इतर तोंडाच्या आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच गुटखा खाणारांनी कहरच केला असून गुटखा खातांना सार्वजनिक ठिकाणी थुंकून, थुंकून बसस्थानक, शाळा, कॉलेज, धर्मस्थळे, एस. टी. महामंडळाच्या बसेस, खाजगी ट्रॅव्हल या रंगवून रंगवून ठेवल्यामुळे सगळीकडे दुर्गंधी व विद्रुपीकरण झाल्याचे दिसून येते.
यामागील कारण म्हणजे सगळीकडे सुरु असलेली अवैध गुटखा विक्री आणि असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील लोहारा गावात सुरु असून येथील एका इसमाने करवंद, जांभूळ, चॉकलेट विक्रीचा व्यवसाय करत, करत कमी श्रमात व कमी वेळात जास्तीत, जास्त पैसा कमावण्याच्या नादात मागील सहा ते सात वर्षांपासून कधी चोरट्या मार्गाने तर कधी दिवसाढवळ्या गुटखा विक्री सुरु केली आहे. विशेष म्हणजे पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील गुटखा विक्रेत्याने “फोन फिरवा व गुटख मिळवा” असा फतवा काढला असून ज्यांना, ज्यांना ठोक, होलसेल गुटखा पाहिजे असेल त्यांनी फोन करताच काही तासांतच त्याच्या घरी गुटखा पुरवला जातो अशी माहिती समोर येत आहे.
विशेष म्हणजे लोहारा येथील गुटखा विक्रेत्याने लोहारा गावात तसेच सोयीनुसार शेत, शिवारात झोपडी व पत्र्याच्या शेडमध्ये गुटख्याची साठवणूक करुन पाचोरा व जामनेर तालुक्यातील जवळपास तीस खेड्यापाड्यात आपले जाळे पसरवले असून खुप मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री करत आहे. ही गटखा विक्री करतांना संबंधित अधिकाऱ्यांना हुलकावणी देण्यासाठी सकाळी चार वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंत व सायंकाळी सहा वाजेपासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत स्वताच्या तीन चाकी व चारचाकी वाहनातून गुटख्याची खुलेआम वाहतूक करुन गावागावांतील पानटपरी, किराणा दुकान, हॉटेल, उपहारगृह, थंड पेय विक्रीच्या व्यवसायीकांना मागणीनुसार पाहिजे तितक्या गुटख्याचा पुरवठा करत आहे.
या गुटखा विक्रीबाबत सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून लोहारा व परिसरातील जवळपास तीस खेड्यापाड्यात होणारी गुटखा विक्री थांबवण्यासाठी लोहारा येथील कायदा आमच्या बापाचा समजणारा व मी सगळ्यांना हप्ते देतो माझे कुणीही काहीही वाकडे करु शकत नाही अशी दादागिरीची भाषा करणाऱ्या करवंद व चॉकलेट विक्रीचा व्यवसाय करत, करत थोड्याच दिवसात लखपती झालेल्या गुटखा किंग वर कठोर कारवाई करुन कायमस्वरूपी अवैध गुटखा विक्री थांबवण्याची मागणी केली आहे.