बोगस खत दिल्यामुळे अंबे वडगाव येथील निलेश गायकवाड यांच्या पाच एकर कापूस पिकाचे नुकसान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०७/२०२३
पाचोरा व जामनेर तालुक्यातील काही कृषी केंद्रातून काही लालची कृषी केंद्राच्या संचालकांनी कमी वेळात जास्त पैसा कमावण्याच्या नादात सरदार कंपनीचे सुपर फॉस्फेट हे खत विक्री करुन शेतकऱ्यांना फसवले असल्याचा प्रकार उघडकीस आला कारण सरदार कंपनीचे सुपर फॉस्फेट ज्या, ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या कापूस पिकाला दिले आहे. त्या, त्या शेतकऱ्यांचे टवटवीत असलेले कापूस पीक कोमेजून सुकत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून याबाबत पाचोरा व जामनेर तालुक्यातील फसगत झालेल्या शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांकडे केली होती.
तसेच संबंधित कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व मा. जिल्हाधिकारी मा. प्रांताधिकारी, मा. तहसीलदार साहेब, यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या होत्या व याबाबत कुऱ्हाड येथील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. अरुण भाऊ पाटील यांनी सत्यजित न्यूजच्या माध्यमातून आवाज उठवला होता. याची दखल घेऊन नामदार मा. श्री. गिरीश भाऊ महाजन यांनी हा विषय लक्षात घेऊन तातडीने मा. जिल्हाधिकारी जळगाव यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन त्वरित चौकशी करुन संबंधित खत उत्पादक कंपनी व कृषी केंद्राचे संचालक दोषी आढळल्यास त्वरित योग्य ती कारवाई करण्यासाठी सुचत केले होते.
म्हणून काल दिनांक १७ जुलै २०२३ सोमवार रोजी दुपारी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. अमित मित्तल साहेब हे भरपावसात पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सरदार कंपनीच्या सुपर फॉस्फेट या खतांमुळे कापूस पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करुन सत्य परिस्थिती जाणून घेतल्यानंतर संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कापूस पिकाचे पंचनामे करण्याचे सांगितले होते. तसेच तेथे जमलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करुन व्यवस्थीत माहिती जाणून घेतल्याने आता आम्हाला योग्य तो न्याय व नुकसानभरपाई मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.
मा. जिल्हाधिकारी यांनी कुऱ्हाड गावातील शेतकऱ्यांसाठीची योग्य त्या सुचना दिल्या असल्यातरी अशीच बोगस सरदार कंपनीच्या सुपर फॉस्फेट खतांची विक्री पिंपळगाव हरेश्वर परिसरातील हर्षिता ॲग्रो एजन्सीच्या माध्यमातून झालेला असून या कृषी केंद्राच्या माध्यमातून याच बोगस सरदार कंपनीच्या सुपर फॉस्फेट खतांची विक्री केली गेली असल्याने बऱ्याचशा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याने आता पिंपळगाव हरेश्वर परिसरातील शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई मिळावी म्हणून ते, ही लवकरच पाचोरा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार देणार असल्याची खात्रीलायक माहिती अंबे वडगाव येथील शेतकरी निलेश गायकवाड यांनी दिली आहे.
(“बऱ्याचशा ठिकाणी तोडी, पाणी झाल्याची चर्चा” प्रसारमाध्यमांनी आवाज उठवताच संबंधित बोगस खत विक्रेत्यांना झोंबल्या मिर्च्या.)