विद्यूत वितरण कंपनीची मनमानी, बळीराज्याच्या डोळ्यात पाणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०२/२०२२
भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो परंतु या देशात खरच शेतकरी (बळीराज्याच्या) हितासाठी झटणारे लोकप्रतिनिधी आहेत का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कारण मोठमोठ्या शहरात, नगरात एक सेकंद सुध्दा विद्युतपुरवठा खंडित होत नाही. मोठमोठ्या कारखानदारांना रात्रंदिवस विद्युतपुरवठा केला जातो. परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतात शेतीमाल पिकल्यावर त्या शेतीमालावर हजारो कारखाने चालतात त्या शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांनाच पुर्णपणे विद्युतपुरवठा मिळत नसेल तर भविष्यात याचे दुष्परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतील यात तिळमात्र शंका नाही. कारण आताच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
(कट आउट नसल्याने सताड उघडे जीवघणे कट आउट बॉक्स)
पावसाळ्यात जेमतेम पीके हाती आली आहेत. पावसाळ्यात नाही तर हिवाळी पिकांच्या मोसमात आपण चांगली पिके घेऊ अशी उमेद उराशी बाळगून शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, दादर, सुर्यफुल, टरबूज व भाजीपाला हि पिके आपल्या शेतात पेरली आहेत. परंतु विद्युतवितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे या पिकांची नासाडी होत आहे. यामागील कारण म्हणजे शेतकऱ्यांना विद्युतपुरवठा करतांना भेदभाव केला जात आहे. कधी रात्री तर कधी दिवसा ठराविक तासच विद्युतपुरवठा केला जातो. हा विद्युतपुरवठा फक्त नावालाच सुरु असतो कारण विद्युतपुरवठा देतांना तो कमी दाबाने मिळत असल्याने विद्युत पंप (मोटार) चालत नाही. यामुळे पिकांना वेळेवर पाणी दिले जात नाही.
(कट आउट दाखवा बक्षीस मिळवा)
यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. रात्रीच्या वेळी विद्युतपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना जंगली श्वापदे, साप, विंचू अशा विषारी प्राण्यांच्या सामना करत जीव मुठीत घेऊन पिकांना पाणी द्यावे लागत आहे. तसेच ज्यांनी डिमांड नोट भरुन अधिकृत कनेक्शन घेतले आहे त्यांना कायदा दाखवला जातो मात्र दुसरीकडे विद्युत वाहिन्यांवर आकोडे टाकून विद्युतचोरी करणारांकडून हप्ते घेऊन त्यांना विद्युतचोरी करण्यासाठी मुक्त परवाना दिला जात असल्याने. ट्रान्सफॉर्मर अतिरिक्त भार पडून यातून वारंवार डी.ओ. जिणे, कटआऊट जाणे, डीपी जळणे, विद्युत पंप जळणे असे तांत्रिक बिघाड होत असतात व हे बिघाड झाल्यानंतर ते लगेचच दुरुस्ती केले जात नाहीत. व लागणारा खर्च शेतकऱ्यांना मागीतला जातो. विद्युतवितरणचे कर्मचारी मुख्यालयात रहात नाहीत. ते गावागावात झीरो वायरमनची नेमणूक करुन उंटावरून शेळ्या चारतात व विद्युतचोरी करणारांकडून हप्ते वसुली करुन माया कमावतात असेही चित्र दिसून येते.
विशेष म्हणजे विद्युतवितरण कंपनीकडून विद्युतचोरी कळवा बक्षीस मिळवा अशी जाहिरात केली जाते मात्र प्रत्यक्षात विद्युतचोरी कळवणारालाच दोष देऊन अपमानित केले जाते या मागील कारण म्हणजे अधिकारी व कर्मचारी यांना विद्युतचोरांकडून मिळणारे हप्ते हे एकमेव कारण आहे.
या गैरप्रकारामुळे विद्युतपुरवठा मिळत नसल्याने पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर, भोजे, चिंचपुरे, शिंदाड, वडगाव कडे, अंबे वडगाव, वरखेडी, कुऱ्हाड व इतर गावातील शेतकरीवर्ग वैतागला असुन येत्या आठ दिवसात पूर्ण (अश्वशक्ती) दाबाने विद्युतपुरवठा न मिळाल्यास तिव्र आंदोलन छेडणार आहे.