वाहन मालक, चालक हो सावधान, पाचोरा शहरात बेशिस्त वाहतूकदारांवर कारवाईचा बडगा सुरु.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०२/२०२२
पाचोरा शहरात एका बाजूला नगरपालिकेच्या अतिक्रमण हटावच्या धडक मोहीमला सुरवात झाली असून या कारवाईबाबत सर्वत्र कौतुक होत असून अतिक्रमण काढण्यात आल्यामुळे पाचोरा शहरातील वाहतूकीची समस्या सुटली असून सगळीकडे सुटसुटीतपणा दिसून येत आहे.
तर दुसरीकडे डी.वाय.एस.पी.मा.श्री.भरत काकडे यांच्या आदेशान्वये पोलिस निरीक्षक मा.श्री. नजनराव पाटील यांनी पाचोरा शहरातील बेशिस्त वाहतूकीला आळा घालण्यासाठी पोलिस कॉन्स्टेबल मा. श्री. गजानन जोशी, मा. श्री. बापुराव महाजन, मा. श्री. संदिप भोई, मा. श्री. सुनील पाटील, प्रकाश पाटील व हरिश अहिरे यांना आदेश देऊन धडक कारवाई सुरु केली आहे.
या कारवाईत भरधाव चालणाऱ्या दुचाकीस्वारांंना आळा घालणे, वाहन चालवण्यासाठीचा परवाना (लायसन्स) नसतांना वाहन चालवणे, स्वयंचलित दुचाकीवरून तिन सिट, चाशर सीट बसून वाहन पळवणे, गाडी चालवतांना डोक्यावर हेल्मेट नसणे, वाहतूकीला अडथळा निर्णय होईल अश्या ठिकाणी भररस्त्यावर वाहन उभे करणे तसेच अल्पवयीन (बालवयात) वाहन चालवणाऱ्या मुलांची संख्या जास्त असल्याचे आढळून आल्याने अश्या अल्पवयीन वाहनधारकांना समज देणे किंवा थेट त्यांच्या पालकांना बोलावून समज देणे तसेच वरील सर्व नियमांची पायमल्ली करणारांवर दंडात्मक कारवाई करुन वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी कारवाईला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे.
या कारवाईमुळे पाचोरा शहरात आपल्या मालकीच्या दुचाकी घेऊन सुसाट, भन्नाट वेगाने चालवून जोरजोरात आरोळ्या मारत फिरणाऱ्या बेशिस्त तरुणांच्या हिरोगिरीला थोड्याफार प्रमाणात लगाम बसला आहे. तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येते. या धडक कारवाई मुळे अपघाताचे प्रमाण कमी होणार असून पायी चालणाऱ्यांंचा त्रास कमी झाला आहे.
परंतु अश्याच पध्दतीची कारवाई भडगाव रोड, शाळा, कॉलेज परिसरातील रस्त्यावर साफळा लाऊन करण्यात यावी अशी मागणी होत आहे. कारण काही दिवसापूर्वी शाळा, कॉलेज नियमित सुरु झाल्या असून शाळा, कॉलेज भरतांना व सुटण्याच्या वेळेत या परिसरात शालेय विद्यार्थी किंवा शाळाबाह्य तरुण मुद्दामहून दुचाकी पळवतात व हिरोगिरी करतात अश्या तक्रारी दबक्या आवाजात महिला व मुलींकडून केल्या जात आहेत.