पाचोरा तालुक्यातील सांगवी प्र. लो. शिवारात बिबट्याचे दर्शन.

सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~२३/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथून जवळ असलेल्या सांगवी शिवारात गावानजीक असलेल्या शेतात बिबट्या आढळून आला सांगवी येथील शेतकरी श्री.अशोक दगा पाटील हे सकाळी पाच वाजता आपल्या पाचोरा रस्त्यावरील शेतात मका पिकास पाणी भरणा करण्यासाठी गेले होते, पिकाला पाणी देत असतांंना त्यांना शेजारी बिबट्याचे दर्शन झाले, बिबट्याला बघताच त्यांची भंबेरी उडाली. घाबरत, घाबरत येऊन गावातील लोकांना त्यांनी या संदर्भात माहिती दिली, त्यांनी सांगितले की बिबट्या आणि माझ्यात केवळ दहा फुटाचे अंतर होते. मी तातडीने त्याच्या डोळ्यावर बॅटरी चमकावली. यामुळे तो मका पिकाच्या शेतात पळाला. गावकऱ्यांनी घटनेची माहिती वनविभागास कळवली असता सकाळी अकरा वाजता वनरक्षक जगदीश ठाकरे, वनपाल प्रकाश देवरे यांनी बिबट्या ज्या ठिकाणी आढळून आला त्या ठिकाणांस भेट देऊन पाहणी केली असता शेजारील रामचंद्र ढाकरे यांच्या शेतात बिबट्याने कुत्रा ठार केले असल्याचे दिसून आले. व त्या ठिकाणावरील आढळून आलेल्या ठशावरून तो बिबट्या असल्याचे निष्पन्न झाले.
म्हणून यापुढे शेतकऱ्यांनी शेतात जाताना समूहाने जावे, हातात काठी व बॅटरी घेऊन जावे, तसेच रात्रीच्यावेळी भरणा करण्यासाठी गेल्यावर शेतात मोठ्या आवाजात टेपरेकॉर्डर, किंवा मोबाईलवर गाणी वाजवत ठेवावी तसेच बांधावर शेकोटी पेटवून जाळ करावा असे आवाहन वन विभागाने उपस्थित शेतकऱ्यांना केले.
मानवाने निसर्गावर केलेले अतिक्रमण यामुळे जंगलातील वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. तसेच जंगलात रानडुक्कर व इतर प्राण्यांच्या शिकारी करण्यासाठी गावागावातून काही तरुण जात असल्याने हे जंगली प्राणी जीव वाचवण्यासाठी जंगल सोडून पळ काढत आहेत. तर दुसरीकडे बेसुमार होत असलेली वृक्ष तोड यामुळे वन्यप्राण्यांना जंगलात आडोसा घेण्यासाठी झाडेझुडपे नसल्यामुळे हे वन्यप्राणी गावाशेजारी असलेल्या शेतशिवरात आढलून येत आहे. यासाठी नैसर्गिक साधन संपती जपण्यासाठी समाजप्रबोधनाची गरज असल्याचे दिसून येत आहे.