लोहारा येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरच उघड्यावर पशुहत्या व मांस विक्री.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०७/२०२२
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे भररस्त्यावर व उघड्यावर मांस विक्री सुरु असून मागील बऱ्याच वर्षांपासून ही उघड्यावरील मांस विक्री बंद करण्यासाठी वारंवार मागणी करूनही आजपर्यंत या उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. विशेष म्हणजे लोहारा ग्रामपंचायतीने या मांसविक्री करणाऱ्या व्यवसायीकांसाठी
दुसरीकडे जागा उपलब्ध करुन दिली असल्यावर ही हे व्यवसायीक आडदांड वृत्तीने मनमानी करत असल्याचे जनमानसात चर्चेत आहे. तसेच येत्या २९ जूलै २०२२ शुक्रवारपासून व्रत, उपवासाचा व धार्मिक सण, उत्सवाचा श्रावण महिना सुरु होणार असल्याने आतातरी ग्रामपंचायतीने जातीने लक्ष घालून उघड्यावर सुरु असलेली प्राण्यांची कत्तल व मांसविक्री थांबवण्यासाठी त्वरित ठोस कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आजच्या बदलत्या काळात सगळीकडेच जवळपास सत्तर टक्के नागरिक मांसाहार करतात. हीच गरज लक्षात घेऊन पाचोरा तालुक्यातील लोहारा ह्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात दर शनिवारी आठवडी बाजार भरतो या आठवडी बाजारात तसेच रविवार, मंगळवार व गुरुवार या दिवशी पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, जळगाव या गावांना जाण्यासाठीच्या मुख्य रस्त्यावरील चौकी परिसरात उघड्यावर बकऱ्या, कोंबड्यांची कत्तल करुन उघड्यावरच मांस विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे.
मात्र ही मांसविक्री करतांना एकाबाजूला पशुवैद्यकीय दवाखाना असून या दवाखान्यात पशुधन वाचविण्यासाठी शासन धडपड करत असतांनाच दुसरीकडे दवाखान्याच्या समोरच भररस्त्यावर बकऱ्या, कोंबड्यांची कत्तल केली जात असून तीन बांबूवर टांगून बोकडांचे शवविच्छेदन केले जाते याच वेळी याच रस्त्यावरून शाळेत येत, जा करणाऱ्या बालवयातील तसेच तरुण विद्यार्थ्यांना, शेतात व इतर दैनंदिन कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या महिलांना हा किळसवाणा प्रकार पाहून त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. कारण बऱ्याचशा महिला व विद्यार्थी हे शुद्ध शाकाहारी असतात त्यांना नहाकच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तसेच याच ठिकाणी उघड्यावर बकऱ्या, कोंबड्यांची कत्तल करुन शवविच्छेदन करतांना अनावश्यक अवयव हे व्यवसायीक रस्तावरच अस्ताव्यस्त वाटेल तीथे फेकून देत असल्याने या फेकलेल्या मांसावर कुत्रे, डुकरे (वराह) येथेच्छ ताव मारतात व याच ठिकाणी कुत्र्यांचे व डूकरांचे युद्ध सुरु होऊन हे भररस्त्यावर एकमेकांच्या तोंडातून मांस हिसकावून घेण्यासाठी पळापळ करतात व याच वेळी या रस्त्यावरून जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, जळगाव जाण्यासाठीचा मुख्य रस्ता असल्याकारणाने कुत्रे, डुकरे वाहनासमोर येऊन धडकतात व अपघात होत असतात. तसेच कुत्र्यांना रक्ताची चटक लागल्यामुळे हे कुत्रे पायी चालणारांच्या अंगावर धावून येत चावा घेत असल्याने अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागत आहे.
तसेच प्राण्यांची कत्तल व मांसविक्री करण्यासाठीचे अनेक कायदे आहेत. परंतु या कायद्याची कुठेही अंमलबजावणी होतांना दिसून येते नसल्याने दिसून येते. वास्तविक पाहता मांसविक्री व कत्तल करण्यापुर्वी प्राण्यांची वैद्यकीय तपासणी करणे आणि नंतरच प्राण्याची कत्तल करणे गरजेचे असते. जर सदर प्राणी रोगट असला तर त्याचे मांस खाण्यायोग्य राहत नाही. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या उपयोगिता प्रमाणपत्रानंतरच प्राण्याची कत्तल केल्या गेली पाहिजे, असे निर्देश आहे. परंतु हे सर्व नियम असतांना कायद्याची एैशीतैशी करून कायद्याला केराची टोपली दाखविण्यात येत आहे. यामुळे उघड्यावर मांस विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार लोहारा गावासह पाचोरा तालुक्यातील गावागावातून सर्रासपणे सुरु आहे.
हा गैरप्रकार सुरु असला तरी याला जबाबदार असणारे अन्न व औषध प्रशासन तसेच इतर जबाबदार विभागातील अधिकारी व कर्मचारी फक्त आणि फक्त बघ्याची भुमिका घेत असल्याकारणाने हे मांसविक्रीचा व्यवसाय करणारे व्यवसायीक रोगट व दुर्धर आजाराचे बोकड व कोंबड्यांची कमी पैशात खरेदी करुन जास्त पैसा कमावण्याच्या नादात रोगट प्राण्याचे मांस विक्री करत असल्याने तसेच यावर घाणीवरच्या माश्या बसत असल्याने मांसाहारी खवय्यांना दुर्धर आजाराची लागण होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
महत्वाचे~
लोहारा येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या समोर रहदारीच्या भररस्त्यावर उघड्यावर मांसविक्री होत असल्याने याठिकाणी मांस व मासे घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागतात. तसेच फेकलेले मांस खाण्यासाठी कुत्रे व डुकरे धुम करत असल्याने या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर अडथळा निर्माण होतो. व लहान, मोठे अपघात होत आहेत.
म्हणून मांसविक्रीचा व्यवसाय करणारांना ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर मांसविक्री करण्यासाठी भाग पाडावे अशी मागणी लोहारा गावासह पंचक्रोशीतील गावागावातून केली जात आहे.