पाचोरा शहरातील एम. एम. कॉलेज भडगाव रोड दत्त मंदिरा शेजारी पोलिस चौकी कायमस्वरूपी सुरु करावी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०२/२०२३
पाचोरा शहरातील एम. एम. कॉलेज भडगाव रोड पाचोरा येथील महाराणा प्रताप चौका जवळीक दत्त मंदिराजवळ पोलिस चौकी उभारण्यात आली आहे. परंतु ही पोलिस चौकी मागील बऱ्याचशा वर्षांपासून बंद अवस्थेत आढळून येत असल्याचे निदर्शनास येत असल्याने ही पोलिस चौकी पूर्ववत पुन्हा सुरु करुन याठिकाणी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी बजरंग दल विश्व हिंदू परिषद पाचोराचे दिपक उदेसिंग राजपूत यांच्यातर्फे दिनांक ०८ फेब्रुवारी २०२३ बुधवार रोजी पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यामागील कारण म्हणजे पाचोरा शहरातील भडगाव रोड परिसरात एम. एम. कॉलेज ही नामांकित शिक्षण संस्था व उच्चभ्रू वर्गातील लोकांची वस्ती असून जवळूनच राज्य मार्ग गेलेला असल्याने या रस्त्यावर शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या, येणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनींची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याचाच फायदा घेत काही टवाळखोर मुले व काही समाजकंटक शाळा, कॉलेजमध्ये व कॉलेजमधून विद्यार्थीनीं घराकडे जातांना मुद्दामहून या रस्त्यावरुन सायकल, मोटारसायकल घेऊन भरधाव वेगाने गाडी चालवत इरसाल चाळे करत शिटी वाजवणे चित्रपटातील गाणी म्हणणे किंवा ठराविक ठिकाणी घोळका करुन उभे राहून वाहतूकदारांना अडथळा निर्माण करणे असे गैरप्रकार करत असतात. यामुळे या परिसरात कायमस्वरूपी वादविवादात होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
अश्या या गैरप्रकारांमुळे बऱ्याचशा पालकांच्या मनात भीती निर्माण झाली असून मुले शाळा, कॉलेजमध्ये पाठवायची कि नाहीत याबाबत चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच या रस्त्यावर चालत असलेल्या गैरप्रकारांना आळा न घातल्यास एखाद्यावेळेस सामाजिक वातावरण बिघडण्याची भिती असल्याकारणाने संबंधित पोलिस चौकी पूर्ववत सुरु करुन त्याठिकाणी कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी पोलिस उपविभागीय अधिकारी पाचोरा यांच्याकडे केली आहे केली आहे.