कोल्हे गावातून गावाठी दारुसह अवैधधंदे हद्दपार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील कोल्हे हे छोटेसे गाव आहे. या गावात मागील वीस वर्षापासून गावठी दारू विक्री सह सगळे अवैधधंदे बंद होते. परंतु मागील दोन वर्षापासून गावात गावठी दारूची अवैध विक्री सुरू झाली होती. ही गावठी दारूची विक्री बंद होण्यासाठी गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी वारंवार प्रयत्न करून सुद्धा गावातील गावठी दारू विक्री करणारे कोणाचे ऐकून न घेता मनमानी पद्धतीने भरवस्तीत भर रस्त्यावर गावठी दारूची विक्री करत असल्याने गावात अशांतता निर्माण झाली होती.
याबाबत समजण्यासाठी गेले असता आम्ही पोलिसांना हप्ते देतो आमचे काही होणार नाही अशी शेखी मिरवत होते. या कारणामुळे गावातील सुज्ञ नागरिक व महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात होता. म्हणून दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ गुरुवार रोजीच्या ग्रामसभेत गावातील गावठीद दारुसह अवैधधंदे बंद होण्यासाठी शकुर गफूर तडवी व असंख्य ग्रामस्थांनी मागणी करत ग्रामपंचायतीला अवैधधंदे बंद करण्यासाठी ठराव मागितला होता.
या ठरावाला सतीश संतोष गोपाळ यांनी अनुमोदन देत सरपंच मा.श्री. अशोक पंढरीनाथ सुरडकर,उपसरपंच सौ.मुन्नीबाई समीर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य मा.श्री. खंडू रामचंद्र माळी, मा.श्री. बबलू शकुर तडवी, सौ.दगुबाई संतोष धनगर, सौ. सपना सतीष गोपाळ, श्रीमती लताबाई दगडू पाटील यांच्या उपस्थितीत हा ठराव ग्रामस्थांचे व ग्रामपंचायतीचे वतीने सर्वजणांच्या साक्षीने पारित करण्यात येऊन या ठरावाची नक्कल त्वरित पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन ला पाठवण्यात आली होती.
याची दखल घेत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. कृष्णाजी भोये यांनी या ठरावाची दखल घेत आपल्या सहकाऱ्यांसह लगेच कोल्हे गावात भेट दिली व अवैध दारू विक्री करणाऱ्यांना बोलावून ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना समोर त्यांना समजून सांगत व कायद्याची भाषा दाखवा गावठी दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी सांगितले आहे.
तेव्हापासून गावात गावठी दारू विक्री बंद झाल्याने ग्रामस्थ व महिलांनी ग्रामपंचायत सरपंच सदस्य व पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचे आभार मानले आहे परंतु भविष्यात पुन्हा दारू विक्री सुरू होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.