तो आला म्हणजे ती जाते, ग्रामीण भागातील जनता हैराण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०६/२०२१
पावसाळ्याचे दिवसात विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरु रहावा म्हणून विद्यूत वितरण कंपनीकडून पावसाळा सुरु होण्याआधी पावर हाऊस पासून तर गावागावातील व शेत शिवारातील विद्यूत तारांच्या व खांबाच्या आसपास असलेल्या झाडांची व्यवस्थित छाटणी (ट्रि कटिंग) करण्यासाठी काही विद्यूत वितरण कंपनीचे कर्मचारी व काही मजूर लाउन तासंतास विद्यूत पुरवठा खंडित ठेवत (ट्रि कटींग) झाडेझुडपे तोडली तसेच इतरही बिघाड दुरुस्ती केली. याकरिता भरपूर प्रमाणात खर्चही केला गेला आहे.
परंतु आता नुकताच पावसाळा सुरू झाला असून जेमतेम चार थेंब पडले तरी ग्रामीण भागातील गावागावातून विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले या कारणास्तव ग्रामीण भागातील जनतेला अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे परिस्थिती लक्षात घेता कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पावसाळ्याच्या अगोदर केलेली कामे खरोखरच काळजीपूर्वक केली आहे किंवा नाही याबद्दल संशय निर्माण होतो.
याबाबत सविस्तर वृत्त असे की उन्हाळ्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते तसेच कृषिपंपांना देण्यात येणारा विद्युतपुरवठा विद्युत वितरण चे मनमानीपणाने कधी रात्री तर कधी दिवसा कधी कमी दाबाने तर कधी जास्त दाबाने दिला जात होता. तरीही ग्राहकांनी कसेबसे दिवस पास केले.
परंतु आता पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी राजा पावसाचे आगमन झाल्याने आनंदात आहे. परंतु पेरणीच्या दिवसात शेतातून राब राब राबून आलेला शेतकरी घरी आल्यावर मात्र हैरान होत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे दोन थेंब पाऊस पडला तरी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सतत विद्यूत पुरवठा खंडित होत असल्याने व आता रॉकेल मिळत नसल्याने घराघरातील दिवा, कंदील कालबाह्य झाले आहेत. ऐन संध्याकाळी व रात्री विद्यूत पुरवठा खंडित होत असल्याने अंधारातच स्वयंपाक करावा लागतो. किंवा गोडेतेलाचे दिवे लाऊन वेळ काढावी लागते तसेच गावागावात डासांचा उपद्रव वाढला असून शेतातून दिवसभर काम करुन थकलेल्या शेतकऱ्याला आरामात झोप घेणे मुश्कील झाले आहे. तसेच पिठाच्या गिरण्या वारंवार बंद राहत असल्याने काही कुटुंबांना भाकरीसाठी पीठ नसल्याने एक तर भात खाऊन किंवा उपाशीपोटी झोपावे लागते तसेच पावसाळा सुरु झाल्यामुळे जमिनीतून साप बाहेर येण्याची घटना वाढल्या आहेत रात्री-बेरात्री शेतकऱ्यांना आपल्या गुराढोरांना चारा टाकण्यासाठी जातांना किंवा इतर दैनंदिन कामे पार पाडताना अंधारातच कामे करावी लागतात यामुळे एखाद्यावेळेस विषारी प्राण्यांने चावा घेतल्यास जीवावर बेतू शकते. तसेच पाणीपुरवठा योजना विस्कळीत होत असल्याने शेतातून थकून-भागून आलेल्या शेतकरी कुटुंबाला दैनंदिन कामकाजासाठी लागणारे पाणी आसपासच्या विहिरीवरुन भरावे लागते.
अश्या एक ना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असतांनाच विद्यूत वितरण कंपनीचे कर्मचारी मुख्यालयात रहात नसल्याने विद्यूत पुरवठा खंडित झाल्यानंतर हातावर हात ठेवून बसावे लागते. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येवर त्वरित तोडगा काढून कायमस्वरूपी विद्यूतपुरवठा कसा देता येईल याकडे लक्ष केंद्रित ग्रामीण भागातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.