पिंपळगाव हरेश्वर, कोल्हे, अटलगव्हाण परिसरात भुरट्या चोरांचा धुमाकूळ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे, कोल्हे, अटलगव्हाण, कुऱ्हाड, वरखेडी, लोहारा परिसरात मागील दीड महिन्यापासून भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असल्याने या परिसरातील शेतकरीवर्ग सह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे.
यामागील कारण म्हणजे सद्या पावसाळी पिकांचा हंगाम जवळपास संपलेला असून आता शेतकरी हिवाळी पिके हरभरा, गहू, सुर्यफुल, दादर तसेच भाजीपाला ही पिके घेण्यासाठी शेतजमीन तयार करुन पेरणी व लागवडीचे काम करत आहे. याकरिता हिवाळी पिकांना पाणी भरण्यासाठी शेतात विद्यूत पंप तसेच डिझेल इंजिन बसवून पाणी भरण्यासाठी व्यवस्था करत आहे.यासोबतच पाईपलाईन करण्यासाठी लागणारे पाइप व इतर साहित्य शेतात नेत आहेत. सोबतच शेतात गुराढोरांची व्यवस्था करून शेतात बांधत आहेत.
याचाच फायदा घेत वरिल गावातील शेती शिवारात व गाव परिसरात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या गैरहजेरीत शेतातील विद्यूत पंप, पाईप, स्टाटर, ऑटो स्विच मोबाईल, शेतीपूरक लोखंडी साहित्य,इतर वस्तू तसेच गुरेढोरे चोरी करण्याचा सपाटा लावला असून यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला असून या सततच्या चोऱ्यांनी त्यांच्या अडचणी अजूनच भर पडली आहे.
गटागटाने देखभाल करणे गरजेचे~
अगोदरच्या काळात बऱ्याच गावातून ठेंगे सोसायटी होत्या. परंतु आता सोसायट्या जवळपास नसल्याकारणाने तसेच शेती शिवार रात्रीच्या वेळी भरणा करण्यासाठी ऑटो स्विचची व्यवस्था करून शेतकरी शेतातील पिकांना पाणी भरत असल्यामुळे शेत शिवारात आता पहिल्यासारखे शेतकरी राहत नाहीत या कारणास्तव चोरट्यांना चोरी करणे सोयीचे जात आहे. म्हणून आपापल्या शेत शिवारात गटागटाने रात्रीच्या वेळी गस्त घातल्यास नक्कीच याचा फायदा होऊन चोऱ्या थांबतील यात शंका नाही.