सरकारमान्य व अनाधिकृत ताडी विक्री केंद्रांमध्ये विषारी ताडीमाडीची विक्री, सर्वसामान्य लोकांच्या जिवाशी खेळ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३०/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील योगेश अंबादास सपकाळे वय अंदाजे ३२ वर्षं हा २६ जून २०२२ रविवार रोजी सकाळी साडेदहा वाजेपासून शेंदुर्णी येथे गेलेला होता. परंतु दुपारी एक वाजेच्यासुमारास तो शेंदुर्णी येथील ताडीच्या दुकानाजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. याला पाहून बघ्यांची गर्दी जमली या गर्दीतील काही लोकांनी ओळखले व तो अंबे वडगाव येथील असल्याची माहिती समोर आली होती. तदनंतर या घटनेबाबत शेंदुर्णी शहरासह पंचक्रोशीतील गावागावातून हळहळ व्यक्त केली जात असून दररोज रोजंदारीवर कामाला जाणारा धडधाकट तरुणाचा असा अकस्मात मृत्यू झालाच कसा अशी शंका जनमानसातून घेतली जात असून ताडी विक्रीच्या दुकानाबाबत अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील काही ताडीच्या दुकानातून रसायनयुक्त ताडी विक्री होत असल्याचा प्रकार समोर येत आहे.
तसेच जनमानसातून तसेच सुज्ञ नागरिकांच्या मते एकाबाजूला ताडी निर्मितीसाठी लागणाऱ्या शिंदीच्या झाडांची लागवड, उपलब्धता व त्यापासून मिळणारी नैसर्गिक ताडी व आजच्या परिस्थितीत जळगाव जिल्ह्यात सरकारमान्य व अनाधिकृत ताडी विक्री केंद्रांमध्ये (दुकानातून) विकली जाणारी ताडी यांचा हिशेब केल्यावर असे लक्षात येते की एका बाजूला ताडी उत्पादनासाठी लागणारी शिंदीची झाडे जळगाव जिल्ह्यात मुबलक प्रमाणात कुठेही उपलब्ध नसतांना दूसरीकडे सरकारमान्य व अनाधिकृत ताडी विक्रीच्या दुकानातून दररोज हजारो लिटर ताडीची विक्री होत असल्याचे दिसून येत असून एवढ्या मोठ्या प्रमाणात ताडीची निर्मिती व उपलब्धता होते कुठुन हा कळीचा मुद्दा उपस्थित केला आहे.
मात्र ही घटना घडल्यानंतर या घटनेबाबत प्रसारमाध्यमांनी शेंदुर्णी येथील ताडीच्या दुकानाजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा अकस्मात मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारित केले होते. ही बातमी बघून तसेच ही घटना घडल्यापासून शेंदुर्णी शहरासह जामनेर, पाचोरा तालुक्यातील गावागावातून तसेच जिल्हाभरातून या विषयावर चर्चेला उधाण आले आहे. याबाबत सुज्ञ नागरिकांनी व जाणकारांनी याबाबत चिंता व्यक्त करत जिल्हाभरातून सरकारमान्य व अनाधिकृत ताडी विक्रीच्या दुकानातून भेसळयुक्त रासायनिक ताडीची खुलेआम विक्री केली जात असल्याने सर्वसामान्य जनतेच्या विशेष करुन तरुण मुलांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याने अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून अश्या ताडी विक्रीच्या दुकानांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
म्हणून याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी काही सुज्ञ, जाणकार लोकांशी संपर्क साधून माहिती घेतली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात ताडी निर्मितीसाठी लागणारी शिंदीची झाडे उपलब्ध नसल्याने जळगाव जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून ताडी आणली जाते. ही आणली जाणारी ताडी अत्यल्प प्रमाणात व भेसळयुक्त असते. ही ताडी जिल्हात आणल्यानंतर ती शासनमान्य व अनाधिकृत तातडीच्या विक्रेत्यांना पुरवली जाते. परंतु ताडीची अत्यल्प प्रमाणात निर्मीती व बाजारपेठ जास्त प्रमाणात मागणी असल्याकारणाने ही संधी साधून ताडी विक्री केंद्रांचे काही मालक, संचालक या नैसर्गिक ताडी मध्ये वेगवेगळ्या रसायनांची भेसळ करुन विक्री करत असल्याची माहिती काही सुज्ञ व जानकर लोकांनी दिली आहे.
या मिळालेल्या माहितीनुसार नैसर्गिकरीत्या मिळालेल्या पांढऱ्याशुभ्र ताडी मध्ये तांदळाच्या पिठाचे पाणी करुन ताडीला नैसर्गिक रंग यावा म्हणून मडी पावडर व त्यामध्ये क्लोरेल हाइड्रेड, Sackharin, ऑक्सिटॉसिन, शेतीसाठी वापरले जाणारे खत युरिया हे व औषधी दुकानातून मीळणारी एक प्रकारची रासायनीक पावडर टाकतात तसेच चव येण्यासाठी गोड, आंबट पदार्थ टाकतात या सर्व प्रकारच्या रासायनिक प्रक्रियेने मिथिल अल्कोहोल तयार होते व मिथिल अल्कोहोल शरीरात जाताच शरीरावरावर झपाट्याने रासायनिक प्रक्रिया होते व त्यामुळे शरीराच्या आतील अवयव झपाट्याने निकामी होऊन अकाली मृत्यू ओढवतो ही रासायनिक ताडी घेतल्याने पोट फुगते याकरिता पोट फुगु नये यासाठी सोड्याचा वापर करतात व अश्या पध्दतीने केवळ एक हजार रुपये खर्चात जवळपास आठ ते दहा हजार रुपये किंमतीची ताडी तयार होते अशी माहिती समोर आली आहे.
परंतु अशा रसायनयुक्त ताडी मुळे ताडी पिणाऱ्या शौकीनांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. ही भेसळयुक्त ताडी पिल्यानंतर डोळ्यात जळजळ, खाज, पोटात जळजळ होते व ही रसायनयुक्त ताडी जास्त दिवस सतत सेवन केल्यास मुत्रपिंड निकामी होऊन डोळ्यांची दृष्टी जाऊ शकते. हे दुष्परिणाम सगळ्यांना माहीत असल्यावर ही ताडी विक्रेते कमी खर्चात व कमी वेळात जास्तीत, जास्त पैसा कमावण्यासाठी हा गैरप्रकार करत आहेत असे निदर्शनास येते. परंतु अशी भेसळयुक्त ताडी ची विक्री थांबवण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन वभागाची तसेच पोलीस प्रशासनाची आहे. मात्र या गैरप्रकारांकडे संबंधित विभागाचे काही जबाबदार अधिकारी व कर्मचारी मुद्दामहून कानाडोळा करत असल्याने ही दुकाने राजरोसपणे सुरु असल्याचा आरोप जनतेतून केला जातो आहे.