*महासूर्याची ऊर्जायनी- राष्ट्रमाता जिजाऊ* *”मृत्यूकार” विनोद अहिरे यांच्या लेखणीतून*
इतिहासाच्या पटलावर ज्या स्त्री व्यक्तिमत्त्वाने आपल्या कर्तुत्वाने आपले नाव कोरले त्यात अग्रभागी ज्यांचं नाव घ्यावं लागेल त्या म्हणजे “राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचं.”
ज्या काळात मराठीमातीत सर्वत्र मुर्दाड आणि नि:सत्व वातावरण निर्माण झालं होतं, पारतंत्र्य गुलामी बद्दल कोणाला तिटकारा वाटत नव्हता, भूमिपुत्रांना मुस्कटदाबी सहन करावी लागत होती, अस्मानी आणि सुलतानीला तोंड देता देता रयत पिचली होती, आणि दैववादी बनवून आजचं मरण उद्यावर ढकलत होती.
मराठीमुलखातील या प्रस्थापितांना उलथून टाकण्यासाठी जिजाऊने स्वराज्याचा पुरस्कार केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांद्वारे तो अमलात आणला. त्यांचा स्वराज्य विचार या मुलखातील नव्या युगाची नांदी होती.हे आपल्याला विसरता येत नाही. ज्या काळामध्ये पतिनिधनानंतर स्त्रियांना सती जाणे अनिवार्य होते परंतु जिजामातेने आपल्या पतीच्या चितेवर उडी न घेता, त्यांनी आपल्या विचारांनी आणि शिवाजी महाराजांच्या तलवारीने शत्रुचीच चिता पेटवली आणि त्यातून निघालेल्या अग्निज्वाळेतुन स्वराज्य निर्माण झालं. शिवाजी महाराजांची तलवार समरांगणावर एखाद्या बिजली सारखी चालत होती. परंतु ज्या तलवारीला ज्या मनगटाने पेललं होतं. त्या मनगटाची ताकद राष्ट्रमाता जिजाऊ होत्या.
जिजाऊ साहेबांचा जन्म 12 जानेवारी 15 98 साली बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा या गावी माळसाबाई लखुजी जाधव यांच्या पोटी झाला.असं म्हणतात, की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तसेच जिजाराणी लहानपणी खेळ-खेळणी, भातुकलीच्या खेळात रमण्याऐवजी तलवार चालवणे, घोडेस्वारी करणे, यांच्यामध्ये रमत होत्या. एके दिवशी जिजाऊंचे चारही बंधू दत्ताजी, अचलोजी,राघोजी आणि बहादूर तलवारीची धडे गिरवत होते. शिक्षक जगदेवराव त्यांना सूचना देत होते. चौघांच्या तलवारी उभ्या-आडव्या वेगाने फिरून घामाघूम झाले होते. इतक्यात गडीचे दार उघडले, सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या. जिजाऊंचा घोडा आत आला, धावत्या घोडयावरुनच जिजाऊराणीने जमिनीवर उडी घेतली, आणि जगदेव रावांना म्हणाल्या, काका साहेब तुमची तलवार द्या.आम्हाला चालवून सराव करायचा आहे. जगरावांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. तलवारीवर हात ठेवून ते म्हणाले आमची तलवार जिजाऊराणी, पेलवेल तुम्हाला?तितक्यात जिजा उत्तरल्या कधी ना कधी पेलावी लागणार ना? मग आज नाही पेलवली तर कधीच पेलवणार नाही ती आम्हाला!
जगदेवराव म्हणाले, घ्या! आमची भवानी तलवार आहे ती. जिथे चालली तिथे फत्ते झाली! आणि जिजाऊंनी तलवार लीलया हातात धरली. एक-दोन हात फिरवले तोच राघोजींनी म्हटलं, ताईसाहेब, तुम्ही आता आलात. आमचे हात झालेत. घाम निघालाय अंगातून..
आणि तुम्ही देखील घोडस्वारीहून आलात दामले असाल… बहादुरने राघोजीकडे बघितलं.
दत्ताजी आणि आचोलजी गप्प उभे होते. जिजाऊ काय बोलणार याचा अंदाज त्यांना होता. जगदेवरांनाही हसू आलं.
नाही, आम्ही जराही दमलो नाही. घोडेस्वारीला आम्ही आजच नाही गेलो. हरदिन जातो. जिजाऊंनी उत्तर दिलं. तलवार हाती घेतली हात करण्यासाठी. तुम्ही दमला असाल तर स्वस्थ बसा. काकासाहेब आहेत त्यांच्यासोबत आम्ही सराव करू. चौघांचे चेहरे उतरले.
नाही, नाही ताईसाहेब.. दत्ताजींनं दोघांना सावरून घेत म्हटलं, आपण हात करू. पण थोडा वेळ. नंतर तुम्ही एकट्या करा. काका आहेतच. चौघे कंटाळले असल्याचं जिजाऊंच्या लक्षात आलं. आपल्याबरोबर त्यांना थांबावं लागणार होतं. ऊन आणखी तापलं होतं. चौघांच्या चेहऱ्यावरची नाराजीही जिजाऊंनी टिपली होती. क्षणभर त्यांनी चौघांकडे पाहिलं. मग म्हणाल्या, आज आम्ही प्रत्येकाची वेगळ्यानं सराव करणार..
मग अचलोजीनं विचारलं फक्त एका बरोबर करणार, असंच ना? मग बाकीच्यांनी जायचं? दत्ताजी निघण्याच्या विचारात होता. नाही! जिजाऊने शांतपणे सांगितलं, तुम्ही चौघे आणि आम्ही एकटे असा हात करू आपण! चौघांनी जगदेवरांकडे पाहिलं. त्यांनी हसून संमती दिली. म्हणाले, जपून! चौघांची तलवारी हाती घेतल्या. जिजाऊनी पवित्रा घेतला. जिजाऊही हाती तलवार घेऊन त्यांच्यासमोर उभ्या ठाकल्या. त्यांनीही पवित्रा घेतला. क्षनात त्यांच्या चेहर्यावरचे भाव बदलले. मृदूभाव लुप्त झाला. क्षणात कणखर आणि आक्रमक पणा प्रकट झाला. आणि जिजाऊत साक्षात चंडिका संचारली. चौघेही भावांचे आघात चुकवीत त्यांची तलवार तळपतली. वेगाने त्या पवित्रे बदलू लागल्या. आघाताला प्रति आघात करू लागल्या. चौघांचे अंदाज चुकवू लागल्या. बोलबोलता सरावाचं रूप बदललं.चौघेही इरेला पेटल्यासारखे झाले. जिजाऊ काही आटोफत्या घेईना!
त्यांची तलवार बिजली सारखी फिरत होती. त्या स्वतः क्षणभर स्थिर राहत नव्हत्या. चौघांचे वार झेलत ते परतवून लावताना पापणी लवायच्या आत त्या पवित्रा बदलत होत्या. जगदेवराव आश्चर्याने जिजाऊकडे पाहत होते. तलवारींचा खणखणाट त्यांना संभळ कडाडत असल्यासारखा वाटला. आणि जिजाऊंची हालचाल चण्डिकेसारखी झाली. जिजाऊंच्या हालचालीकडे पाहताना जगदेवराव थक्क झाले. जिद्द, चिकाटी, जोश,वेग सावधपणा, प्रतिघात…..
जगदेवराव धावतच त्यांच्याजवळ आले. आणि जोराने ओरडले थांबवा डाव, सगळे थांबा..आणि जिजाऊला ओढून घेत म्हणाले ,आम्ही जिंदगीभर तलवार चालवली दादासाहेबांनी चालवलेली पाहिली पण तुमच्यासारखं तेज तलवार चालवणं नाही पाहिलं! तुमच्या हाती तलवार होती की बिजली प्रश्न पडला होता आम्हाला..!
म्हणूनच की काय? माताजिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज सारख्या महासुर्याची उर्जायनी झाली आणि स्वराज्याचे प्रकाशकिरण महाराष्ट्र भूमीवर पडलें.
अशा या महान स्री शक्तिला त्यांच्या जयंतीदिनी आम्ही नतमस्तक होऊन विनम्रपणे अभिवादन करतो
पो.ना. विनोद अहिरे पोलीस मुख्यालय जळगाव
९८२३१३६३९९