लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मनमानी, सर्वसामान्य रुग्णांच्या डोळ्यात पाणी. उपचाराअभावी नवजात शिशू दगावल्याचे खात्रीलायक वृत्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०७/२०२२
शासन सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सतत प्रयत्नशील असते व आहे. याकरिता शासन लाखो नव्हे तर करोडो रुपये खर्च करून गाव तेथे आरोग्य केंद्र, वाडा, वस्तीवर उप आरोग्य केंद्र तर मोठ्या लोकसंख्येच्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारुन त्याठिकाणी दरमहा पन्नास हजार रुपयांहून अधिक एक लाख रुपयापर्यंत पगार घेत असलेले उच्चशिक्षित म्हणजे एम. बी. बी. एस. वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करुन त्याठिकाणी आरोग्यसेवक, आरोग्यसेविका व इतर कर्मचारी नेमून आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देत असते.
परंतु शासनाच्या शासकीय दवाखान्यात म्हणजे ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपकेंद्रात त्याठिकाणी नेमून दिलेले वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी योग्य पध्दतीने, इमानेइतबारे आपली जबाबदारी पार पाडत आहे किंवा नाही याकडे मात्र शासन, लोकप्रतिनिधी यांचे कमालीचे दुर्लक्ष व उदासीनता दिसून येते असल्याने आज जळगावात जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच उप आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला वेळेवर आरोग्य सुविधा मिळत नसल्याचे दिसून येत असून उपचाराअभावी काही ठिकाणी रुग्णांनी आपला जीव गमावल्याच्या घटना घडल्या आहेत.
(लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत संतप्त प्रतिक्रिया देताना लोहारा येथील भा.ज.पाचे जेष्ठ कार्यकर्ते मा. श्री कैलास आप्पा चौधरी, मा. श्री. शरद भाऊ सोनार, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पाटील व पिडीत महिला.)
असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु असून मागील काही वर्षांपासून निवासी डॉक्टर नव्हते परंतु आता या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. कु. चित्रलेखा पाटील यांची निवासी डॉक्टर म्हणून तर व मनोजकुमार राजपूत यांची कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु हे दोघेही वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात हजर राहत नसून कर्मचाऱ्यांच्या भरवशावर उंटावरून शेळ्या चारत असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना व्यवस्थीत उपचार मिळत नसल्याने त्यांना पदरमोड करून खाजगी डॉक्टरकडे जाऊन उपचार करुन घ्यावे लागत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत लोहाच्या, कळमसरा, कामसपुरा, म्हसास, रामेश्वर तांडा, शहापुरा, कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक, लाख तांडा, सांगवी, नाईक नगर, अंबे वडगाव, कोकडी तांडा, वडगाव जोगे, अंबे वडगाव बुद्रुक, अंबे वडगाव खुर्द, सार्वे, जामने या १८ गावांचा समावेश असून अंदाजे चाळीस हजार लोकसंखेची आरोग्याची धुरा लोहाच्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहे. विशेष म्हणजे वरीलपैकी १८ गावात नव्वद टक्के लोकसंख्या ही शेतकरी, शेतमजूर व हातमजूरांची असून यांची परिस्थिती सर्वसामान्य असल्याने हे सगळे लोक आजारपणात उपचार करुन घेण्यासाठी लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येत असतात.
परंतु या आरोग्य केंद्रात नियुक्त केलेल्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एकही वैद्यकीय अधिकारी या दवाखान्यात हजर रहात नसल्याने दवाखान्यात उपचार करुन घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना तेथील कर्मचारी उपचार करुन देतात. तर जास्तीत, जास्त रुग्णांना परत पाठवण्यात येत असल्याने व वैद्यकीय अधिकारी नसल्याने उपचाराअभावी माघारी जाऊन हातात पैसा नसतांनाही उधार, उसनवारी करून तसेच पदरमोड करून बाहेरील खाजगी दवाखान्यात उपचार करुन घ्यावे लागत असल्याची बाब समोर येत आहे.
विशेष म्हणजे सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकरी वर्ग दिवसभर शेतात राबत असतात. संध्याकाळी घरी आल्यानंतर बऱ्याचशा लोकांना अंगदुखी, हातपाय दुखणे, भरपावसात काम केल्यामुळे ताप येणे किंवा शेती शिवारातील विहीरीचे पाणी पिण्यात आल्यानंतर संडास, उलटीचा त्रास होणे, यापेक्षाही घातक म्हणजे शेतात काम करत असतांना सर्पदंश, विंचु चावणे, जंगली श्वापदाचा हल्ला अश्या घटना घडल्यानंतर लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्यावर तेथे वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने संबंधित पिडीतांना उपचार करुन घेण्यासाठी पाचोरा, जामनेर किंवा जळगाव येथे जाऊन उपचार करुन घ्यावे लागत आहेत.
परंतु या धावपळीत संबंधित गरजूंना प्रवासखर्च, स्वतंत्र वाहन केल्यास तो खर्च तसेच खाजगी डॉक्टरकडे जाऊन उपचार करुन घेण्यासाठी लागणारा खर्च सहन करावा लागतो तसेच लोहारा येथुन तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ जात असल्याने एखादेवेळी सर्पदंश, विषारी औषधांची बाधा झालेले बाधीत तस बाळांतपणासाठी आलेल्या गरोदर महिला, हृदयविकाराच्या तक्रारी असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार न मिळाल्याने व प्रवासात वेळ गेल्यामुळे आपला जीव गमावण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच आजही वैद्यकीय अधिकारी हे मुख्यालयात रहात नसल्याने अशी वेळ येऊ शकते अशी भीतीही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वैद्यकीय अधिकारी नसतांना कर्मच्याऱ्यांची शैली~
लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी हजर रहात नसल्याने या ठिकाणी रुग्ण आल्यावर जर का साधारण लक्षण असतील तर तेथे हजर असलेल्या आरोग्यसेविका किंवा आरोग्य सेवक उपचार करुन वेळ मारुन नेतात. तसेच ह्रदयविकाराचा त्रास होत असलेले रुग्ण, अपघातात किंवा शेतात काम करतांना जखमी झालेले व ज्यांच्या जखमेवर टाके घालण्याची गरज आहे असे रुग्ण, विषबाधा झालेले, सर्पदंश झालेले रुग्ण, गरोदर माता तपासणी किंवा बाळंतपणासाठी आलेल्या महिलांना वैद्यकीय अधिकारी नसल्यावर हे आरोग्य सेवक मानसिक आधार देण्याऐवजी त्यांचे मानसिक खच्चीकरण करून तुमची प्रकृती चिंताजनक आहे तुम्हाला जळगाव किंवा पाचोरा येथे जाऊन उपचार करून घ्यावे लागतील असे सांगून या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नसल्याचे उघड होऊ देत नाहीत व परस्पर दुसरीकडे पाठवून देतात असे असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मोगलशाही फतवा~
(आमचा भ्रमणध्वनी क्रमांक कुणालाही देऊ नये अशी कर्म सक्त ताकीद)
बऱ्याचशा रुग्णांना रुग्णालयात गेल्यावर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यचे सांगण्यात येत व याबाबत सविस्तर विचारणा केल्यावर तेथील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात किंवा जळगावला मीटिंग साठी गेले आहेत. कार्यालयीन कामकाजासाठी गेले आहेत. अशी विविध कारणे सांगून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानीवर व हलगर्जीपणावर पांघरून घातले जाते तसेच कधी कधी सुज्ञ नागरिकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक मागितल्यास आमच्या जवळ त्यांचा भ्रमणध्वनी नाही. आम्ही त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक तुम्हाला देऊ शकत नाही असे उत्तर देऊन हलकट वागणूक देऊन तिथून रुग्णांना हाकलून दिले जाते अशीही माहिती काही रुग्णांनी दिली आहे.
लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्त करण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी कु. डॉ. चित्रलेखा पाटील ह्या मुख्यालयात रहात नसल्याने लोहारा येथील तसेच गावागावातून नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून हे अधिकारी मनमानी कारभार करतात तसेच आरोग्य केंद्रात तसेच आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेत येणाऱ्या गावागावांतील आरोग्य सेविका व आरोग्य सेविकांना सुध्दा हकनाक त्रास देत असतात अशी तक्रार काही आरोग्य सेवक व आरोग्य सेवक तसेच इतर कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली असून वैद्यकीय अधिकारी कु. डॉ चित्रलेखा पाटील यांनी कारण नसतांना किंवा छोट्या, छोट्या कारणांवरून कर्मचाऱ्यांना समजून न सांगता किंवा समजून न घेता वारंवार नोटीस बजावून मानसिक छळ करत असल्याचे सांगितले हा प्रकार येथेच थांबत नसून काही कर्मच्याऱ्यावर कारवाई करण्यात यावी याकरिता मनमानी अहवाल तयार करून व वरिष्ठांपर्यंत पाठवला असून काही कर्मचाऱ्यांचे वेतन सुद्धा थांबवण्यात आले असल्याने बरेचसे कर्मचारी तोंड दाबून मुक्याचा मार सहन करत असून ते हातबल होऊन आपले कामकाज इमाने बरे करीत असल्याची चर्चा व माहिती सत्यजित न्यूज कडे प्राप्त झाली आहे
तसेच आज रविवार रोजी सकाळी लोहारा येथील एका महिलेचे बाळंतपण झाल्यानंतर नवजात बालकाची प्रकृती ठीक नसल्याने या नवजात बालकास लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने व योग्य वेळी योग्य उपचार व योग्य सल्ला न मिळाल्याने या नवजात बालकाचा मृत्यू झाला असल्याने लोहारा गावातून या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा तीव्र निषेध करत संतप्त भावना व्यक्त केले आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊन सत्यजित न्यूज या प्रकरणाचा लवकरच पाठपुरावा करणार आहे.
अशा घटना घडत असल्यावर सुद्धा तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच जिल्हा वैद्यकीय अधिकारी हे डोळे असून आंधळे अशी भूमिका बजावत असल्यामुळे या लोहारा येथील दोघेही वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणून आता तरी जिल्हा व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणाचीही भाड-भिड न ठेवता संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची त्वरित उचल बांगडी करून यांचे जागेवर कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध राहतील अशा डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी लोहारा ग्रामस्थांनी केली आहे.