विद्युत खांब पडल्याने अंबे वडगावची पाणीपुरवठा योजना ठप्प, ठिबकवर लावलेल्या कापूस पिकाला फटका बसण्याची शक्यता.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०६/२०२३
रविवार दिनांक ०४ जून २०२३ रोजी महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात जोरदार वादळवाऱ्यासह रोहीनीच्या पावसाने हजेरी लावली. या वादळवाऱ्यात घराच्या छताची पत्रे उडाली, मोठमोठे वृक्ष घरावर, रहदारीच्या रस्त्यावर, वाहनांवर, पाळीव प्राण्यांवर, विद्युत खांबावर तसेच विद्युत वाहिनीच्या तारांवर पडल्याने गावागावातील तसेच शेत शिवारातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. आज ०७ जून २०२३ बुधवार उजाडला तरीही विद्युत वितरण कंपनीकडून वादळात पडलेले विद्युत खांब उभे करण्यासाठी तसेच तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या तारा जोडण्यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न होत नसल्याने विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराबाबत विद्युत ग्राहकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
विद्युत खांब पडल्याने अंबे वडगावची पाणीपुरवठा योजना ठप्प, ठिबकवर लावलेल्या कापूस पिकाला फटका बसण्याची शक्यत
“कापूस पीक हातचे जाण्याची शक्यता”
शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला यावर्षी भाव मिळाला नाही तरीही येत्या हंगामात कापसाला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कर्ज काढून, लहान, गहान करत घरातील लक्ष्मीच्या अंगावरील सौभाग्याच लेन असलेल मंगळसूत्र व इतर दागिने विकून शेतात ठिबक सिंचनाद्वारे कापसाची लागवड केली आहे. वातावरणातील तापमानामुळे या ठिबकवर लागवड केलेल्या कापूस पिकाला वेळेवर पाणी देणे महत्त्वाचे आहे. जर वेळेवर पाणी दिले नाहीतर कापूस पीक हातचे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. व अश्यातच वादळवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विद्युत खांब पडून विद्युत वाहिनीच्या तारा तुटून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
“पिठाच्या गिरण्या व पाणी पुरवठा योजना ठप्प”
विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे गावागावातील पिठाच्या गिरण्या बंद पडल्या असल्याने दररोज कमाऊ आणत उदरनिर्वाह करणाऱ्या गोरगरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच गावागावातील पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्याने गावकऱ्यांना गावच्या आसपासच्या विहिरींचे पाणी प्यावे लागत असल्याने या अशुद्ध पाण्यामुळे अनेकांना उलटी, मळमळ, संडास, अपचनाचा त्रास जाणवत आहे. विशेष म्हणजे दिवसभर शेतात राब, राब राबून थकुन घरी आल्यानंतर डोक्यावर हंडा घेऊन पाणी भरावे लागत असल्याने महिलावर्ग कमालीचा त्रस्त झाला आहे.
“विद्युत वितरण कंपनीचा गलथान कारभार”
सद्यस्थितीत पाचोरा तालुक्यातील विद्युत वितरण कंपनीचा कारभार रामभरोसे सुरु आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण गावागावात नियुक्त केलेले लाईनमन व विद्युत सहायक हे नियमितपणे मुख्यालयात रहात नसून ते घरीच राहतात. व यांनी गावागावातील काही सुशिक्षित बेरोजगार तरुणांना हाताशी धरून त्यांना महिन्याकाठी ७०००/०० ते ९०००/०० रुपये देऊन त्यांची विद्युत वितरण कंपनीची कोणतीही परवानगी न घेता त्यांची झीरो वायरमन म्हणून परस्पर नियुक्ती करण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
“ठेकेदारांकडून होणारी कामे निकृष्ट दर्जाची”
विद्युत वितरण कंपनीच्या नवीन विस्तारीकरणासाठी म्हणजे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे, नव्याने नवीन विद्युत खांब उभारणी करणे, या खांबावर विद्युत वाहिनीच्या तारा ओढणे, जुने टाकलेले, झुकलेले विद्युत खांब सरळ करणे ही कामे सद्यस्थितीत ठेकेदारांकडून करुन घेतली जात आहेत. परंतु ही कामे करुन घेतांना ती नियमानुसार केली जात नसल्याचे जनमानसातून चर्चीले जात आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता विद्युत खांब उभारतांना पुरेसा खोल खड्डा न खोदणे, खांब उभा केल्यावर खड्यात सिमेंट, दगड, वाळु न वापरता फक्त दोन, चार दगड टाकून मातीने खड्डा भरणे, ठराविक ठिकाणी खांब वाकू नये किंवा झुकू नये म्हणून आवश्यक त्या ठिकाणी तान देणे म्हणजे (त्या खांबाला एका पीळदार तारांच्या सह्याने बांधून ठेवणे) अशा गरज असलेल्या तांत्रिक बाबींना तिलांजली देत खमी खर्चात विद्युत खांब उभारले जात असल्याने थोडेफार वादळ आले तरी हे थातुरमातुर उभे केलेले विद्युत खांब कोसळतात व यामुळे विद्युत ग्राहकांना नको त्या समस्यांना सामोरे जावे लागते अशा तक्रारी विद्युत ग्राहकांनी केल्या आहेत.