जळगाव गुन्हा शाखेने चोरीच्या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०२/२०२४
जळगाव गुन्हा शाखेने दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रविवार रोजी चोरीच्या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की भडगाव तालुक्यातील पथराड येथील जगदिश बाळू शेळके वय वर्षे (२३) याच्या विरोधात चोरी केल्याप्रकरणी २०२१ मध्ये ३७९ कलमाखाली चाळीसगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून जगदीश शेळके हा फरार झाल्यापासून पोलीस आरोपीच्या शोधत होते.
आरोपीचा शोध घेणे कामी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. महेश्वर रेड्डी साहेब, चाळीसगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. किसन नजन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे चाळीसगाव विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अभयसिंह देशमुख पोलीस उपनिरीक्षक चौबे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे, पोलीस हवालदार लक्ष्मण पाटील, पोलीस हवालदार अक्रम शेख, पोलीस हवालदार किरण चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील याचे पथक तयार करुन फरार आरोपी जगदीश शेळके याच्या बाबत माहिती काढून रितसर कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या.
पोलीस फरार आरोपीच्या शोधत असतांनाच चाळीसगाव पोलीस स्टेशनला भादवी कलम ३७९ मधील फरार असलेला आरोपी जगदीश शेळके हा भडगाव तालुक्यातील पथराड येथे मुळगावी येणार असल्याबाबत गुप्त माहिती जळगाव गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. किसन नजन पाटील यांना गुप्त माहिती मिळताच वर नेमणुक पोलीस पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रविवार रोजी पाळत ठेवून भडगाव तालुक्यातील पथराड येथुन संशयित फरार आरोपीस पकडून त्याला त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जगदीश बाळू शेळके वय वर्षे (२३) राहाणार पथराड तालुका भडगाव असे सांगितल्याने फरार आरोपीची ओळख पटताच त्याला शिताफीने ताब्यात घेऊन विचारपूस करुन पुढील कायदेशीर कारवाई करीता चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.