मालखेडा येथील मार्ग निवाऱ्याचा वापर चक्क लाकडे ठेवण्यासाठी, प्रवाश्यांची गैरसोय.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०५/२०२२
अंबे वडगाव येथुन जवळच असलेल्या जामनेर तालुक्यातील मालखेडा या गावी आमदार मा. श्री. गिरीश भाऊ महाजन यांच्या निधीतून प्रवाश्यांच्या सोयीसाठी मार्ग निवारा (प्रवासी निवारा) बांधण्यात आलेला असून प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांना एस.टी.बस किंवा इतर प्रवासाचे साधन उपलब्ध होईपर्यंत ऊन, वारा, पाऊस याच्यापासून बचावासाठी तसेच वाहनची वाट पहाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून रहदारीच्या भर रस्त्यावर उभे रहाण्याची वेळ येऊ नये म्हणून हा मार्ग निवारा बांधण्यात आलेला आहे.
तसेच मालखेडा या गावाची वस्ती दोन तांड्यात विभागली गेली असून या दोघेही गावाच्या लोकसंख्येचा विचार केला तर मालखेडा गावातील शेकडो लोक दररोज बाहेरगावी जातात व येतात तसेच या दोघेही गावातील जवळपास २०० ते २५० विद्यार्थी शेंदुर्णी येथे शिक्षणासाठी जात असतात. या विद्यार्थी संख्येनुसार यात मुलींची संख्या मोठ्याप्रमाणात असल्याने त्यांना शाळेत जातांना याच बसथांब्यावर थांबावे लागते परंतु बसथांब्यावर आल्यानंतर बसथांबा परिसरात बांधण्यात आलेला मार्ग निवारा खचाखच लाकडांनी भरलेला असल्याकारणाने गरजु प्रवासी व बहुसंख्य विद्यार्थी व विशेष करुन विद्यार्थीनींनी आपला जीव धोक्यात घालून भर ऊन, वारा, पावसात एस.टी. ची किंवा इतर वाहानांची भररस्त्यावर थांबून वाट पहात उभे रहावे लागत आहे.
मालखेडा हे गाव जामनेर ते पाचोरा रस्त्यावर असून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. तसेच एस.टी. निवाऱ्यात लाकडे भरलेली असल्याकारणाने प्रवासी वाहानाची वाट पहात उभ्या असणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो म्हणून संबंधित जबाबदार अधिकारी किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या मार्ग निवाऱ्यातील लाकडे त्वरित काढून रंगरंगोटी करून प्रवाशांना बसण्यासाठी मार्ग निवारा रिकामा करुन द्यावा अशी मागणी शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींनी व सुज्ञ नागरिकांनी केली आहे.