कुऱ्हाड खुर्द येथे ठेकेदाराच्या मनमानीला चाप,पाण्याच्या टाकीचे निकृष्ट होत असलेले बांधकाम ग्रामस्थांनी बंद पाडले.
सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~०६/०१/२०२२
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील साई नगर परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी नवीन टाकीचे बांधकाम सुरु आहे. मात्र हे बांधकाम करतांना ठेकेदार मनमानी करत असून टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करत असल्याने जागरुक ग्रामस्थांनी हे बांधकाम बंद पाडले असून या निकृष्ट बांधकामाची चौकशी होऊन चांगल्या दर्जाचे बांधकाम व्हावे अशी मागणी केली आहे.
कुऱ्हाड येथे साई नगर परिसरात ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून दहा लाख रुपये किंमतीच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम मागील महिनाभरापासून सुरू आहे. पाण्याच्या टाकीचे काम जवळपास ७५’/, टक्के झालेले आहे. परंतु दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी ठेकेदाराने माती व दगडगोटे मिश्रित वाळू आणल्यामुळे व अगोदर झालेल्या बांधकामासाठी अशीच निकृष्ट वाळू वापरली आहे. व आत्ताक्ष अशीच निकृष्ट वाळू वापरली जात असल्याने या परिसरातील नागरिकांनी उपसरपंच अशोक देशमुख यांना ही माहिती काल दुपारी कळवली. त्यांनी स्थानिक पत्रकार समवेत थेट टाकीचे बांधकामाच्या ठिकाणी जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेतली असता ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारी योग्य असल्याचे आढळून आल्यामुळे टाकीचे बांधकाम बंद केले आहे.
ही पाण्याची टाकी भरवस्तीत बांधली जात असून या टाकीचे बांधकामासाठी चांगल्या प्रतीची वाळू न वापरता मातीयुक्त व निकृष्ट दर्जाची वाळू वापरत आहे. तसेच सिमेंटचे प्रमाणही कमी असल्याने बांधकाम दर्जेदार होत नसल्याने भविष्यात ही पाण्याची टाकी टिकणार नसल्याची भिती व्यक्त करत ही टाकी वापरत असतांना जर कोसळली तर या टाकीची उंची व टाकीच्या भोवताली असलेली घरे यांना धोका निर्माण होऊन जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
म्हणून या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाची सखोल चौकशी होऊन संबंधित ठेकेदाराच्या मनमानीला आळा घालावा अन्यथा बांधकाम करु दिले जाणार नाही असा पावित्रा कुऱ्हाड गावचे उपसरपंच मा.श्री. अशोक देशमुख व सूज्ञ नागरिकांनी घेतला आहे.