वनविभागाचा अजब कारभार दिवसा कारवाईचा दंडा रात्री लाकुड कटाई फंडा .
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०३/२०२४
मागील महिन्यात एका निसर्गप्रेमीने पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात सुरु असलेली अनाधिकृत अवैध वृक्षतोड तसेच काही विनापरवाना व अधिकृत लाकुड वखारी बाबत वनविभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जळगाव व पाचोरा येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचोरा तालुक्यातील भोजे येथील वक्रतुंड सॉ मिलमध्ये येऊन चौकशी केली असता त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध लाकुड साठा आढळून आल्याचे बोलले जात आहे.
हा लाकुड साठा अनाधिकृत व अवैध वृक्षतोड झाल्याचा पक्का पुरावा हाती लागताच संबंधित चौकशी अधिकाऱ्यांनी सर्र लाकडाचे मोजमाप सुरु करुन आमची चौकशी पुर्ण होईपर्यंत एकही लाकुड जागेवरुन हलायला नको तसेच आजपासून लाकुड कटाई बंद म्हणजे (आरा मशिनवर लाकुड कापू नये) अशी सुचना दिली होती. मात्र संबंधित अधिकारी व कर्मचारी हे दिवसभर लाकडाचे मोजमाप करुन सायंकाळी निघून गेल्यावर संबंधित सॉ मिलच्या मालकाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करुन रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोडीतून विनापरवाना विकत घेतलेल्या लाकडांची कटाई करुन ते लाकुड इतर ठिकाणी पसार केल्याचे बोलले जात आहे. यामुळे (वनविभागाचा अजब कारभार दिवसा कारवाईचा दंडा रात्री लाकुड कटाई फंडा) असा कारभार सुरु आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात विरप्पनची पिल्लावळीने धुमाकूळ घातला असून पाचोरा, भडगाव, जामनेर तालुक्यात दररोज हजारो हिरव्यागार वृक्षांची स्वयंचलित मिशनच्या साह्याने विनापरवाना दिवसाढवळ्या बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. ही वृक्षतोड जामनेर, शेंदुर्णी, लोहारा, पाचोरा, भडगाव या लाकुड वखारींच्या संचालकांच्या छत्रछायेखाली व कृपाशीर्वादाने केली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कारण या तिघही तालुक्यातील अनाधिकृत लाकुड व्यापारी हे बिनधास्तपणे वृक्षतोड करुन ही लाकडे जामनेर, पाचोरा, भडगाव, शेंदुर्णी, लोहारा येथील लाकुड वखारीवर नेऊन विकतांना दिसून येत आहेत.
असाच काहीसा गैरप्रकार पाचोरा तालुक्यातील भोजे येथील वक्रतुंड सॉ मिलमध्ये मागील काही वर्षांपासून सुरु आहे. परंतु आता कुणीतरी एका समाजसेवकाने बेसुमार होणारी वृक्षतोड थांबवून पर्यावरणाच्या रक्षणासाठी तक्रार केली होती. अशी या तक्रारीची दखल घेत जळगाव येथील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भोजे येथील वक्रतुंड सॉ मिल येथे मागील आठवड्यात धाडसत्र राबवून चौकशी सुरु केली व या वक्रतुंड सॉ मिलची चौकशी करुन त्या सॉ मिलमध्ये व सॉ मिलच्या परिसरात उघड्यावर पडलेल्या लाकुड साठ्याची मोजदाद केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
परंतु तक्रारीची शहानिशा करतांना संबंधित तक्रारदाराला विश्वासात घेऊन त्यांच्या उपस्थितीत चौकशी करणे बंधनकारक असतांना मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित तक्रारदाराला कोणत्याही प्रकारची माहिती न देता परस्पर चौकशी करुन सॉ मिलमध्ये झालेल्या अनाधिकृत प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत तर नाहीत ना अशी शंका निर्माण झाली आहे. कारण कारण या वक्रतुंड सॉ मिलमध्ये मागील काही वर्षांपासून विरप्पनलाही मागे टाकले असून अवैध लाकुड व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देऊन मोठ्या प्रमाणात अवैध लाकुड खरदी करुन एकप्रकारे निसर्गसंपदेची मोठ्या प्रमाणात चोरी केली आहे. म्हणून या वक्रतुंड सॉ मिलची सखोल चौकशी होऊन कारवाईची मागणी केली आहे.
कारण आत्ताच्या परिस्थितीत असलेले वखारीजवळ तसेच इतर खाजगी व काही शासकीय भूखंडावर अनाधिकृतपणे साठवलेला लाकुड साठा कसा व कुठुन आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लाकुड साठा आढळून आला असला तरी हे लाकुड वखारीवर घेतांना शासकीय नियमानुसार घेतले आहे का ? जर हे लाकुड शासकीय नियमानुसार घेतले असेल तर मग याची वनविभागाकडून रितसर परवानगी घेतली आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. म्हणून संबंधित चौकशी पथकाने कुणाच्याही दबावाला बळी न पडता सखोल चौकशी करुन लाकुड साठा जप्त करुन वक्रतुंड सॉ मिलवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी असंख्य निसर्गप्रेमी वृक्ष प्रेमींनी केली आहे.