कुऱ्हाड व लोहारा परिसरात अवैधधंद्यांचा सुळसुळाट, पो.हे.कॉ. निवृत्ती मोरे यांची बदली करा. शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. तानाजी पाटील यांची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०५/२०२१
कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक तसेच लोहारा गावात सट्टा, पत्ता, जुगाराचे अड्डे तसेच गावठीदारु व देशीदारुची अड्डे भरवस्तीत, हमरस्त्यावर, धार्मीक स्थळांजवळ दिवसाढवळ्या रात्रंदिवस सुरु असल्याने या गावातील शांतता भंग झाली असून या अवैधधंद्यांच्या अड्ड्यावर आसपासच्या खेड्यातील व स्थानिक लोकांची गर्दी होते व सामजिक अंतर (सोशल डिस्टेंसिंगचा) फज्जा उडत आहे.
या अवैधधंद्यांचे बाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला व दूरक्षेत्रचे पो.हे.कॉ. निवृत्ती मोरे यांच्याकडे वारंवार तोंडी स्वरूपात तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने व दिवसेदिवस अवैधधंद्ये करणारांचे प्रमाणात वाढत आहे.
म्हणून मनमानी करणाऱ्या पो.हे.कॉ. निवृत्ती मोरे यांची बदली होऊन संपूर्ण अवैधधंद्ये बंद न झाल्यास होणाऱ्या परिणामांची जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असा इशारा कुऱ्हाड येथील शिवसेनेचे विभागप्रमुख मा.श्री. तानाजी पाटील. यांनी दिला आहे.
याबाबत शिवसेनेचे गटनेते मा.श्री. तानाजी पाटील. यांनी दिलेली माहिती अशी की लोहारा, कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक गावात मागील दोन महिन्यापासून कोरोनासारख्या आजाराने थैमान घातले आहे. आजपर्यंत बरेचसे कोरोनाबाधीत दगावले आहेत. आता मागील आठवड्यापासून वरिल तिघेही गावातून कोरोनाबाधीतांची संख्या कमी होत आहे.
परंतु लोहारा पोलीस चौकीवर पो.हे.कॉ. निवृत्ती मोरे यांची नेमणूक झाल्यापासून कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक व लोहारा गावात सट्टा, पत्ता, जुगार तसेच गावठीदारुसह देशीदारुची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोहारा येथे पोलीस चौकी असल्यावरही या गावात तसेच कुऱ्हाड गावात पाट्या लाऊन सट्टा पेढी, जुगाराचे व दारुचे अड्डे दिवसाढवळ्या भरवस्तीत रात्रंदिवस सुरु असून या गाव परिसरातील व खेड्यापाड्यातील लोक व्यसनपूर्तीसाठी मोठ्या संख्येने एकत्र येतात व एकप्रकारे यात्राच भरते व सामाजिक अंतर (सोशल डिस्टनसिंग) चा फज्जा उडत आहे. या कारणांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
तसेच या सुरु असलेल्या अवैधधंद्यांमुळे व्यसनाधीन लोक व्यसनपूर्तीसाठी घरातील भांडी, धान्य, दागदागिने तसेच पशुधन विकून आपली तलफ भागवत असल्याने घराघरात भांडण तंटे होत आहेत. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलेही दारुच्या आहारी जात असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे.
(गावठीदारुचे पाउच)
अवैधधंद्यांचे बाबत पिंपळगाव पोलीस स्टेशनला वारंवार सांगूनही हे अवैधधंदे बद होत नसल्याने महिलावर्ग व सुज्ञनागरीक संतप्त झाले असून येत्या आठ दिवसात कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक व लोहारा येथील अवैधधंदे पूर्णपणे बंद करण्यात यावेत तसेच या अवैधधंदे करणारांना पाठिशी घालणारे पो.हे.कॉ.निवृत्ती मोरे यांची त्वरीत बदली करण्यात यावी अन्यथा जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे गटप्रमुख मा.श्री. तानाजी पाटील यांनी दिला आहे.