तारखेडा येथे कपाशीच्या गाडीवर हमाली करणाऱ्या मजुराच्या डोक्यात फरशी मारणारा कापूस व्यापारी अजूनही मोकाटच, आरोपीला राजाश्रय मिळाला असल्याने पोलिस हतबल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०२/२०२४
पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे कपाशीच्या गाडीवर हमाली करणाऱ्या मजुराच्या डोक्यात एका कापूस व्यापाऱ्याने फरशी मारुन दुखापत केल्याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित जखमीला प्रथम पाचोरा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र संबंधित जखमी इसमाच्या डोक्याला अस्थिभंग झाला असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असून जखमी जुबेरची प्रकृती चिंताजनक असल्याचे खात्रीलायक वृत्त असून जखमी जुबेरच्या डोक्याला मार लागुन कवटीचा अस्थिभंग झालेला असल्यावरही साधारण कलमा लावण्यात आल्या असल्याने सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून या मारेकऱ्यांना विरुद्ध भा. द. वी. कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करुन त्याला त्वरित अटक करणे गरजेचे होते अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की तारखेडा गावात सोयगाव तालुक्यातील तिडके येथील कापूस व्यापारी शांताराम दामू पाटील तसेच वाघळी येथील नाना अभिमान पाटील हे त्यांचा मुलगा राहुल यांच्यासोबत तारखेडा गावात दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ सोमवार रोजी कापूस खरेदी करण्यासाठी आले होते. ही कापूस खरेदी सुरु असतांना वाघळी येथील कापूस व्यापारी नाना अभिमान पाटील यांना कापूस मोजण्यासाठी एका गल्लीत गाडी घेऊन जायचे होते. परंतु त्याच रस्त्यावर याच रस्त्यावर तिडका येथील कापूस व्यापारी शांताराम दामू पाटील यांच्या गाडीत कापूस भरणे सुरु होते. हे पाहून वाघळी येथील कापूस व्यापारी यांनी शांताराम पाटील यांच्या गाडीवर हमाली करणाऱ्या मजुरांना रस्त्यावर असलेली गाडी बाजूला करण्यासाठी सांगितले असता या गाडीवरील चालक गाडी काढत असतांनाच नाना पाटील व त्यांचा मुलगा राहुल गाडी लवकर काढा असे म्हणत गाडी चालक व गाडीत कापूस भरणाऱ्या मजूरांना दमदाटी सुरु करत आई, बहिणी वरुन अश्लील शिवीगाळ करुन वाद घातला असता कापूस व्यापारी शांताराम दामू पाटील यांच्याकडे कापूस भरण्याचे कम कराणारे मंजूर जुबेर हानीफ पठाण व त्याचे वडील हानीफ गणी पठाण यांनी कापूस व्यापारी नाना अभिमान पाटील यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्या व्यापाऱ्याने हानीफ गणी पठाण यांच्या छातीवर चापटा, बुक्क्यांचा मार देत अश्लील शिवीगाळ केली. नाना पाटील आपल्या वडिलांना मारहाण करत असल्याचे पाहून जुबेर हा समजावण्यासाठी गेला असता नाना पाटील यांनी जुबेरला घट्ट मिठीत धरुन ठेवले व राहुल याने अगोदर गाडीतून टामी काढून जुबेरच्या डोक्यात जोरदार वार केला नंतर जवळच अंगणात पडलेली फर्शी उचलून डोक्यावर जोरदारपणे हल्ला चढवत डोक्यात फर्शी मारली व आता तुला जीवंत ठेवणार नाही तुला मारुनच टाकेल अशी धमकी दिली. याच वेळी नाना पाटील यांच्या गाडीवरील मापाडी हा सुद्धा हातात कापूस मोजण्यचा लोखंडी काटा घेऊन मारण्यासाठी धाऊन आला होता.
या जबर मारहाणीत जुबेर याला डोक्यात जबर मार लागल्यामुळे तो जमीनीवर कोसला तेव्हा त्याच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होते. जुबेरची ही परिस्थिती पाहून त्याच्या सोबत कापूस भरणाऱ्या मजूरांनी त्याला उचलून खाजगी वाहनांतून पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा पाचोरा पोलीस स्टेशन कडून उपचारासाठी मेमो देण्यात आला होता. परंतु जुबेर याच्या डोक्याला जोरदार मार लागल्यामुळे व रक्त वाहत असल्याने त्याला पाचोरा येथील डॉ. निळकंठ पाटील यांच्या दवाखान्यात नेले असता त्याच्या डोक्याला मोठी इजा होऊन कवटीच्या हाडाचा अस्थिभंग झाला असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असता त्याला जळगाव येथील ॲक्झॉन (Axon) हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून सद्यस्थितीत जखमी जुबेरची प्रकृती चिंताजनक असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
असे असले तरीही जखमी जुबेरची प्रकृती चिंताजनक असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या मारहाणीच्या घटनेबाबत वाघळी येथील कापूस व्यापारी नाना अभिमान पाटील त्यांचा मुलगा राहुल नाना पाटील व त्यांचा मापाडी व तारखेडा येथील शेतकरी या चौघांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली असून दिलेल्या फिर्यादीवरून भा. द. वी. कलम ३२३, ३२६, ३५२, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.
ब्रेकिंग न्यूज ~ बातमी लिहीत असतांनाच जखमी जुबेरचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी हाती आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त उद्या सकाळी.