पाचोरा आगारातून सकाळी सात वाजता सुटणारी पाचोरा ते एरंडेल एस. टी. बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०३/२०२३
पाचोरा आगारातून दररोज सकाळी सात वाजता सुटणारी पाचोरा ते एरंडोल एस. टी. मागील काही महिन्यांपासून बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातील एस. टी. च्या प्रवाशांचे अतोनात हाल होत असून जेष्ठ नागरिकांना मोफत सवलतीचा पास असल्यावरही पदरमोड करुन प्रवास करावा लागत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील पंचवीस वर्षांपासून पाचोरा आगारातून दररोज सकाळी सात वाजता पाचोरा ते एरंडोल एस. टी. सुरु आहे. ही एस. टी. बस पाचोरा, नांद्रा, कुरंगी, माहिजी, बोरनार, म्हसावद मार्गे एरंडोल येथे जाते. परंतु मागील काही महिन्यांपासून पाचोरा आगारातून सकाळी सात वाजता सुटणारी ही एस. टी. बस अचानकपणे बंद करण्यात आली आहे. ही बस बंद झाल्यापासून पाचोरा ते एरंडोल मार्गावरील वर नमूद केलेल्या गावातील शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तासिका बुडून शैक्षणिक नुकसान होत आहे.
तसेच आता वार्षिक परीक्षा सुरू असून ही बस सुरू नसल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना पायी प्रवास करत शाळा कॉलेजला जाऊन परीक्षा द्याव्या लागत आहेत. तसेच याच गावागावातील ज्येष्ठ, श्रेष्ठ नागरिक, महिला दिव्यांग बंधू भगिनी यांच्याकडे सवलतीचे पास असल्यावरही एस. टी. सेवा बंद असल्याने स्वतःची पदरमोड करून भाडे खर्चून दैनंदिन कामासाठी बाहेरगावी जावे लागत आहे.
पाचोरा ते एरंडोल बस बद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे लक्षात घेऊन ती पूरर्वत सुरु करण्यासाठी माहिजी येथील ए. मज्जिद सालार इकरा उर्दू हायस्कूल तर्फे पाचोरा आगाराचे आगारप्रमुख यांना दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ गुरुवार रोजी लेखी निवेदन देण्यात आले आहे. परंतु आजतागायत पाचोरा आगाराचे आगारप्रमुख यांनी या मागणीकडे कमालीचे दुर्लक्ष केले असल्याने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी आज दिनांक १४ मार्च २०२३ मंगळवार रोजी पुन्हा स्मरणपत्र देऊन पाचोरा ते एरंडोल बस त्वरित सुरु करावी अशी मागणी केली आहे.
कारण पुढील आठवड्यापासून विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा सुरु होत असल्याने एस. टी. बस सुरु करणे अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून येत्या दोन दिवसात सकाळी सात वाजता सुटणारी पाचोरा ते एरंडोल बस सुरु न झाल्यास नांद्रा, कुरंगी, माहिजी, बोरनार, म्हसावद, या गावागावातील विद्यार्थी व ग्रामस्थ जन आंदोलन छेडण्याच्या तयारीत असून एस. टी. बस सुरु न झाल्यास विद्यार्थ्यांचे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी पाचोरा एस. टी. आगारप्रमुखांची असेल असा इशारा दिला आहे.