अवैध धंद्यांना प्रतिष्ठितांचे पाठबळ, कारवाईसाठी पोलिसांची धावपळ. मुक्ताईनगर, बोदवड चौफुलीवर अन्न व औषध प्रशासनाने ५६ लाख ८३ हजारांचा गुटखा पकडला.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०३/२०२३

मुक्ताईनगर तालुक्यासह जळगाव, जामनेर, चाळीसगाव, भुसावळ येथे मुक्ताईनगरच्या जवळच असलेल्या मध्यप्रदेश मधून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा वाहतूकीसह विक्री म्हणजे थोडक्यात (तस्करी) होत असल्याची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. अश्यातच एका बाजूला विधानपरिषदेचे आमदार मा. श्री. एकनाथराव खडसे यांनी गुटखा तस्करीचा मुद्दा उपस्थित केला असतांनाच दुसरीकडे नाशिक येथील अन्न व औषध प्रशासनाच्या गुप्तवार्ता पथकाने मागील पंधरा दिवसात दोन वेळा मध्यप्रदेशातून जळगाव जिल्ह्यात येणारा अंदाजे करोडो रुपये किंमतीचा गुटखा पकडला असल्याने मा. श्री. एकनाथराव खडसे यांच्या आरोपात तथ्य असल्याचे पून्हा एकदा सिद्ध झाले आहे.

तसेच मागील १५ दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने या अगोदरही मुक्ताईनगर चौकात २६ लाखांचा गुटखा पकडला होता. तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभाग गुप्तवार्ता विभागाचे सुरक्षा अधिकारी मा. श्री. अविनाश दाभाडे यांच्या पथकाने मध्यप्रदेशातून जळगाव जिल्ह्यात अवैध मार्गाने गुटख्या घेऊन येणाऱ्या आयशर गाडीचा पाठलाग करुन मुक्ताईनगर येथील बोडवड चौफुली जवळील उड्डाणपूलाखाली गाडी अडवून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या राजनिवास गुटख्याचा मोठा साठा पकडला असून या प्रतिबंधीत गुटख्याचा ५६ लाख ८३ हजार रुफयांचा गुटख्याचा साठा जप्त केला असला तरी या गुटख्याची बाजारपेठेतील करोडो रुपये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या कारवाईची माहिती मिळताच विधानपरिषदेचे आमदार मा. श्री. एकनाथराव खडसे यांनी घटनास्थळी जाऊन अन्न व औषध प्रशासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई केली म्हणून अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी मा. श्री. दाभाडे साहेब व मा. श्री. भरकड साहेबांचे अभिनंदन केले. तसेच अन्न व औषध प्रशासन गुप्त विभाग अधिक मजबूत करण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्यासाठीची अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त मा. श्री. अभिमन्यू काळे साहेब यांच्याकडे मागणी केली असून मुक्ताईनगर सह जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, जामनेर, चाळीसगाव, जळगाव शहरांसह परिसरातील अवैध रीत्या गांजा व गुटख्याची होणारी विक्री कायमस्वरूपी रोखण्यासाठी आवश्यक त्या कडक उपाययोजना कराव्यात असे निर्देश दिले.

विधानपरिषदेचे आमदार मा. श्री. एकनाथराव खडसे यांनी गुटख्या पकडून कारवाई करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाचे नाशिक गुप्तवार्ता अधिकारी व जळगावच्या कार्यालयातील अधिकारी यांचे प्रत्यक्ष जाऊन कौतुक करत अभिनंदन केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. तसेच मा. श्री. एकनाथराव खडसे यांची ही कृती कौतुकास्पद असल्याची चर्चा मुक्ताईनगर परिसरात दिवसभर सुरु होती.

वृत्त विशेष ~ *************************************
विधानपरिषदेचे आमदार मा. श्री. एकनाथराव खडसे यांनी संपूर्ण जिल्ह्यात सट्टा, पत्ता, जुगार, अवैध दारु तसेच गुटखा विक्री सह इतर अवैध धंदे राजरोसपणे सुरु असल्याचे सांगितले आहे. परंतु हे अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने चालतात हे शोधणे महत्त्वाचे आहे. आजपर्यंत जेव्हा, जेव्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा, तेव्हा पोलीस प्रशासन, दारुबंदी विभाग, अन्न व औषध प्रशासन किंवा इतर संबंधित विभागांना जबाबदार धरुन दोष दिला जातो परंतु यामागील खरे सुत्रधार, कळीचे नारद हे मात्र पडद्याआड राहून जातात. आज पोलीस व इतर विभागातील काही अधिकारी व कर्मचारी हप्ते घेतात हे सुर्य प्रकाशा इतके सत्य आहे. मात्र संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची हप्ते घेण्यासाठी हिंमत कशी होते हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

याबाबत अधिक बोलायचे झाले तरी सांधे तीन सिट दुचाकीस्वाराला पोलीस अडवून त्याला कागदपत्रे विचारतात तेव्हा आमच्यापैकी कुणीतरी संबंधित पोलीसांना फोन करुन आमचा माणूस आहे, आमचा कार्यकर्ता आहे असे सांगून कारवाई थांबतात असेच बरेचसे अनुभव आल्यानंतर कर्तव्यनिष्ठ राहून उमेदीने काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मानसिकता खराब होते व मग ते कारवाईसाठी झटून कुणाचे तरी बरेवाईट दोन शब्द ऐकुन घेत कारवाई थांबवावी लागत असेल तर मग यापेक्षा दोन पैसे मिळतात म्हणून ते कुणाच्याही किंवा कुठल्याही झंझट मध्ये पडत नाहीत. व तेथूनच देवाणघेवाण सुरु होते.

याचेच जिवंत उदाहरण म्हणजे आज बऱ्याचशा ठिकाणी सट्टा पिढी, गावठी व देशी दारुची अवैध विक्री करणारे, जुगाराचे क्लब वाले, गुटखा विक्रेते, रेशनिंग माफिया, लाकुड माफिया हे आपापल्या सोयीप्रमाणे कुठल्या ना कुठल्या पक्षात, संघटनेत सामील होऊन पदाधिकारी बनून संबंधित पक्षाचा किंवा संघटनेचा रुमाल गळ्यात घालून किंवा पक्ष किंवा संघटनेचा मोठा फलक लाऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव आणून दिवसाढवळ्या अवैध धंदे राजरोसपणे करत आहेत.

म्हणून अवैध धंद्यांना प्रतिष्ठितांचे पाठबळ कारवाईसाठी पोलिसांची धावपळ असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण गावागावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कमेट्या, पोलिस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यापैकी या अवैध धंद्याचे विरोधात कारवाई करण्यासाठी मागणी करत नाहीत. ग्रामसभेचे ठराव पाठवत नाहीत. ही मोठी खेदाची बाब आहे.