आले पोलीसांच्या मना तेथे कोणाचे चालेना, पाळधी शिवारातील गावठी हातभट्टी उध्वस्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०३/२०२४
आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हा अधीक्षक मा. श्री. रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील पोलीसांनी आपली मरगळ झटकून अवैध धंद्याच्या विरोधात जोरदारपणे वॉश आऊट मोहीम हाती घेतली आहे. अशीच धडक कारवाई आज दिनांक २५ मार्च २०२४ सोमवार रोजी पाहूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सचिन सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पहुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाळधी व नाचनखेडा गाव परिसरात व वाघुर नदी काठावरील गावठी निर्मितीच्या अड्ड्यावर धाड टाकून दारु भट्ट्या व दारु निर्मितीसाठी लागणारे साहित्य, कच्चे, पक्के दोनशे लिटरच्या १० टाक्या म्हणजे एकुण २००० लिटर अंदाजे किंमत ४००००/०० हजार रुपये किंमतीचे रसायन आढळून आले होते या रसायनाचे पंचासमोर नमुने घेऊन रासायनिक परिक्षणाकरीता घेऊन उर्वरित कच्चे रसायन नष्ट करत दारु पाडण्यासाठी लागणारे साहित्य व सामुग्री जाळून जागेवर नष्ट करण्यात आले आहे
या कारवाईत पाळधी व नाचनखेडा येथील कैलास झिपरु भोई, ईश्वर झिपरु भोई हे स्वतंत्ररीत्या गावठी हातभट्टीची दारु गाळतांना आढळून आल्यामुळे त्यांच्यावर दारुबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. या धडक कारवाईत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर ठाकरे, होमगार्ड आर. पी. देशमुख, हिरालाल बारी, वाहन चालक हेमंत सोनवणे, यांचा सहभाग होता.