पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये मातृ, पितृ दिन उत्साहात साजरा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०२/२०२४
पाश्चात्य संस्कृतीनुसार १४ फेब्रुवारी हा दिवस अनेक ठिकाणी व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्यात येतो. मात्र पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये या चुकीच्या संस्कृतीला आडफाटा देण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये चांगली संस्कृती व विचार रुजवण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस मातृ, पितृ दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
या निमित्ताने दिनांक १४ फेब्रुवारी २०२४ बुधवार रोजी पाचोरा येथील वेदांत समिती व गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता चौथी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आमंत्रित करुन भारतीय परंपरेनुसार विद्यार्थ्यांकडून मातृ, पितृ पूजन करण्यात आले. तसेच आपल्या जीवनात आईवडील (पालकांचे) महत्त्व काय असते हे विद्यार्थ्यांना सांगुन ते पटवून दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आईवडील किती महत्त्वाचे आहेत हे समजून घेत असतांना पालकवर्ग, विद्यार्थी व विद्यार्थीवर्ग भावूक झाले होते व त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.
याप्रसंगी आपल्या जीवनात आपल्या आईवडिलांचे किती महत्त्व आहे हे जाणून घेतांना विद्यार्थ्यांचे व पालकवर्गाचे डोळे पाणावले होते. विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील पालकांचे महत्त्व लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्या आयुष्यात पालकांना सर्वोच्च स्थान देऊन आयुष्यभर ऋणी राहून सन्मानाने वागु अशी प्रतिज्ञा घेतली. शिक्षणासोबतच भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलमध्ये सतत सांस्कृतिक व प्रासंगिक कार्यक्रम आयोजित केले जातात व या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाश्चात्य संस्कृतीपासून दूर करण्यासाठी जे प्रयत्न केले जातात हे विद्यार्थी जीवनात अत्यंत महत्त्वाचे कार्य या गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून केले जाते असेच सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्येक शाळेत घेतले तर नक्कीच आपल्या भावी पिढीला आपल्या संसाराचा अभिमान राहील व ते चारित्र्यसंपन्न जीवन जगतील असे मत पालकांनी व्यक्त केले व गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या आयोजकांचे तोंडभरून कौतुक करत मनापासून आभार मानले.