दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/१२/२०२३

पाचोरा शहरातील भडगाव रस्त्यावर रेल्वे पुलाच्या जवळच असलेल्या दैवयोग मंगलयात आज एका विवाह सोहळ्याप्रसंगी वऱ्हाडी मंडळी लग्नसमारंभाच्या कार्यक्रमात मग्न असल्याचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने दुपारी दीड वाजेच्या सुमारास दुचाकी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील भावेश अमरचंद बाफना हे पाचोरा येथील दैवयोग मंगल कार्यालयात नातेवाईकांच्या लग्नात सामील होण्यासाठी गेले होते. या विवाह सोहळ्यात जाण्यासाठी त्यांनी त्यांचा मित्र कोल्हे येथील रहिवासी मयूर नितीन मिळी याची एम. एच. १९ डी. एक्स. ६१६० या क्रमांची मोटारसायकल घेऊन गेले होते. विवाह सोहळा आटोपल्यावर भावेश बाफना हे घराकडे निघण्याच्या तयारीत दैवयोग मंगल कार्यालयाच्या बाहेर आले व त्यांनी ज्याठिकाणी त्यांच्या ताब्यातील वरील क्रमांची दुचाकी उभी केली होती ती जागेवर नसल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी दैवयोग मंगल कार्यालय परिसरात सर्वत्र शोधाशोध केली मात्र दुचाकी आढळून न आल्याने आपल्या ताब्यातील दुचाकी मोटारसायकल चोरीला गेल्याची खात्री झाली.

आपल्या ताब्यातील मोटारसायकल चोरीला गेली म्हणून त्यांनी लगेचच पाचोरा पोलीस स्टेशनला येऊन घडलेली घटना सांगितली व गाडी चोरीला गेल्याबद्दल तक्रार लिहून घेण्यासाठी पोलीस स्टेशनला हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना विनंती केली असता पाचोरा पोलीस स्टेशनचे एक कर्मचारी यांनी दैवयोग मंगल कार्यालयाजवळ येऊन मोटारसायकल कुठे उभी केली होती तसेच इतर माहिती जाणून घेतली व आम्ही आमच्या पध्दतीने रस्त्यावर असलेल्या सी. सी. टी. व्ही. चा आधार घेऊन तपास करतो तुम्ही उद्या या असे सांगून परत पाठवले असल्याचे भावेश बाफना यांनी सत्यजित न्यूजशी बोलतांना सांगितले आहे.