दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/१२/२०२३

सद्यस्थितीत पाचोरा शहरातील वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळ्या घटना घडत असून मागील दोन महिन्यांपासून एका नामांकित डॉक्टरांच्या दवाखान्यात बरेच वादळ निर्माण झाले होते. आता नुकतेच दिनांक २१ डिसेंबर २०२३ गुरुवार रोजी पाचोरा शहरातील नामांकित डॉक्टर मुकुंद सावनेरकर हे सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या दवाखान्यात ओ. पी. डी. मध्ये रुग्ण तपासणी करत असतांना शिंदाड येथील भागवत पाटील व इतर सात अनोळखी इसमांनी ओ. पी. डी. मध्ये अनधिकृतरित्या गैरकायदा प्रवेश करत शिंदाड येथील महिलेच्या उपचाराबाबत विचारणा करत वाद घातला अरेरावीची भाषा वापरुन डॉ. मुकुंद सावनेरकर यांच्या उजव्या कानशिलात चोरात चापट मारल्याची घटना घडली होती.

या घटनेनंतर डॉ. मुकुंद सावनेरकर यांनी शिंदाड येथील भागवत पाटील व अन्य अनोळखी सात संशयितांविरुद्ध पाचोरा पोलीसात दिली. या फिर्यादीवरुन पाचोरा पोलीस स्टेशनला भा. द. वी. कलम १४३, १४६, १४९, ३४१ ३२३, ३२५, ५०४, ५०६ व महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन्स व्हाईलंस ॲंड डॅमेट ॲक्ट कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहेत.

असे असले तरी वैद्यकीय क्षेत्रात या वारंवार होणाऱ्या चुकीच्या घटनांमुळे पाचोरा शहरासह तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.