दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०१/२०२४

रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे असे म्हटले जाते. तसेच याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठमोठे फलक लावले जातात. मात्र वास्तविक परिस्थिती पाहता याकरिता जबाबदार असलेले घटक खरच रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी काम करतात का हा प्रश्न पाचोरा ते जामनेर रस्त्यावरील लोहारी व वडगाव आंबे या गावाजवळील अतिक्रमणावरुन निर्माण होतो.

पाचोरा ते जामनेर रस्त्यावर लोहारी, वरखेडी, वडगाव आंबे या गावांच्या बसस्थानक परिसरात तसेच रहदारीच्या रस्त्यावर विविध प्रकारच्या व्यवसायीकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणापैकी जामनेर ते शेंदुर्णी रस्त्याचे रुंदीकरण होत असल्याने काल दिनांक ०६ जानेवारी २०२४ शनिवार रोजी वरखेडी येथील बसस्थानक परिसरापासून ते भोकरी येथील रेल्वे फाटकापर्यंतचे अतिक्रमण संबंधित विभागाकडून काढण्यात आले आहे. यामुळे वरखेडी व भोकरी परिसरातील पाचोरा ते जामनेर रस्त्या हा अतिक्रमणमुक्त झाला असल्याने सुज्ञ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

असे असले तरी अजूनही पाचोरा ते जामनेर रस्त्यावरील वडगाव आंबे येथील बसस्थानक परिसरातील अतिक्रमण जैसे थे असल्याने मागील काही वर्षांपासून या परिसरात रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. विशेष बाब म्हणजे याच रस्त्यालगत जिल्हापरिषद मराठी मुलांची शाळा प्राथमिक विद्यामंदिरात असून या शाळेच्या जवळपास तसेच थेट प्रवेशव्दाराच्या अगदी जवळच पत्र्याच्या शेडमध्ये व टपऱ्या मध्ये काही व्यवसायीकांनी आपले व्यवसाय सुरु केले आहेत. हा त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न असला तरी दुसरीकडे रस्त्यावरील वाहतूक पाहाता जिल्हापरिषद मराठी मुलांची शाळा प्राथमिक विद्यामंदिरात जाणाऱ्या, येणाऱ्या लहान, लहान शाळकरी मुलांना रस्त्यावरील वाहन व वाहनचालकांना शाळेतून बाहेर येणारे विद्यार्थी दिसत नसल्याने एखाद्यावेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या विविध व्यवसायांच्या दुकानात दिवसभर ग्राहकांची गर्दी असल्याने एकच गोंधळ होऊन शिक्षकांना अध्यापनाचे कार्य व्यवस्थितपणे करता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या कुऱ्हाड खुर्द गावाला सतावत असून कुऱ्हाड खुर्द गावात बसस्थानक परिसरात ते कुऱ्हाड गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंतच्या पर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. यामुळे बसस्थानक परिसरातील अतिक्रमणामुळे कुऱ्हाड येथून बाहेर गावी जाणारे एस. टी. प्रवासी व पाचोरा येथे शाळा, कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी व विशेष करुन विद्यार्थीनींना बस येईपर्यंत रस्त्यावरुन येणाऱ्या, जाणाऱ्या वाहनांना सामना करत भररस्त्यात ताटकळत उभे रहावे लागते आहे. यामागील कारण म्हणजे कुऱ्हाड खुर्द गावातील प्रवाशांसाठी प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे मात्र काहींनी या प्रवसी निवाऱ्यात तसेच आसपासच्या परिसरात अतिक्रमण केले आहे. तसेच याच प्रवासी निवाऱ्यासमोर बरीचशी वाहने उभी रहात असल्याने या परिसरात आजपर्यंत बरेचसे लहानमोठे अपघात व वाहनचालकांशी शाब्दिक चकमक व वाद होत असतात तसेच एखाद्यावेळी गोराडखेडा येथे अपघात होऊन दोन निष्पाप जीवांचे बळी गेले अशीच घटना कुऱ्हाड खुर्द येथेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मत कुऱ्हाड खुर्द येथील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.

म्हणून कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे अशी मागणी गावातील ग्रामस्थ, महीला विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केली आहे.