पिंपळगाव हरेश्वर येथील गोठाणपुरा परिसरातील जुगाराच्या अड्ड्याचा दहा खेड्यात नावलौकिक.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/१२/२०२३
पाचोरा तालुक्यातील समस्या जाणून घेण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी पाचोरा तालुक्याचे माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांनी पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांना आमसभा घेण्यासाठी सांगितले आहे. याच सोबत पाचोरा, भडगाव तालुक्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली असून गावागावात, खेड्यापाड्यात अवैध धंदे तसेच वाळु माफिया, गौण खनिज उत्खनन व चोरी हे अवैध धंदे राजरोसपणे सुरु असल्याचे सांगत अधिकारी मस्तावले असल्याचा ठपका ठेवून हा गैरप्रकार रोखण्यासाठी आमसभा घेण्याचे आवाहन केले आहे.
अश्यातच पिंपळगाव हरेश्वर हे पवित्र तिर्थक्षेत्र व पोलीस स्टेशनचे गाव असल्यावरही या गावात सट्टा, पत्ता, जुगार, गावठी दारुची निर्मिती व विक्री तसेच देशी दारुची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. विशेष म्हणजे हे व्यवसाय हमरस्त्यावर तसेच पोलीस स्टेशनच्या चारही बाजूंनी दिवसरात्र, दिवसाढवळ्या, राजरोसपणे सुरु असल्याने अवैध धंदे थांबवून सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी असलेल्या पोलीस स्टेशनला अवैध धंद्याच्या अड्ड्यानीच चौफेर घेऊन पोलीस स्टेशनला एकप्रकारे आव्हान दिले आहे की काय असा प्रश्न सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केला आहे.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या जवळूनच वरसाडे तांडा रस्त्यावर गोठाणपुरा परिसरात एक जुगाराचा अड्डा राजरोसपणे दिवसाढवळ्या, रात्रंदिवस सुरु असून हा अड्डा आसपासच्या दहा खेड्यात नावारूपाला आला आहे. याठिकाणी पिंपळगाव हरेश्वर गावासह आसपासच्या दहा खेड्यापाड्यातील तसेच सोयगाव तालुक्यातील जुगारी येथे जुगार खेळण्यासाठी येतात यातच या अड्ड्यावर दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते असे खात्रीलायक वृत्त असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात सावकारीचा व्यवसाय केला जातो.
या सावकारीच्या व्यवसायातून जुगारात पैसे हारलेल्या लोकांना दर दिवसाला दहा रुपये शेकड्याने व्याजाने पैसे दिले जातात. तसेच हे पैसे देतांना हरलेल्या जुगारींकडून घरातील सोने, नाणे किंवा दागिने त्यांच्या जवळील दुचाकी गहाण ठेवून पैसे दिले जातात. तसेच वेळेवर पैसे दिले नाहीत तर व्याजाच्या रकमेवर व्याज आकारणी केली जाते. यातुनच मागील काळात पिंपळगाव हरेश्वर व जवळच असलेल्या एका गावातील जुगारी व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
तरीही पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या गावात बसस्थानक, शाळा, कॉलेजच्या रस्त्यावर तसेच प्रार्थनास्थळे, भरवस्तीत व रहदारीच्या ठिकाणी हे अवैध धंदे राजरोसपणे सुरु असल्याने महिलावर्ग व सुज्ञ नागरिकांनी नाराजी व्यक्त करत जो कुणी अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करतो त्यालाच आरोपी करण्यासाठी हप्ते घेणारे पोलीस व अवैध धंदे करणारे संयुक्तपणे मोहीम राबवून त्याला चुप बसवण्यासाठी प्रयत्न करतात व खोटे गुन्हे दाखल करतात असा अनुभव येतो म्हणून या अवैध धंद्याच्या विरोधात कुणीही आवाज उठवत नाही अशी माहिती समोर येत आहे.