शहरात फाइव्ह जी, ग्रामीण भागात मात्र एजी, ओजी, लोजी, सुनोजी मोबाईल ग्राहकांची आर्थिक लूट व दैनंदिन कामात अडथळा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/१२/२०२३
आजकालच्या युगात मोबाइल फोन हा आमच्या जीवनात एक अविभाज्य घटक बनला असून महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मोबाईलमुळे आम्हाला अनेक फायदे होत असले तरी काही दोष असल्यामुळे काही तोटे देखील आहेत. मोबाईलचा योग्य वापर करत फायदे आणि तोटे या दोन्ही बाजूंनी विचार केला तर साधारणपणे, मोबाईल फोनचे नक्कीच भरपूर फायदे आहेत
सर्व प्रथम आमच्या दैनंदिन जीवनात मोबाईल फोनला संप्रेषणाचे सर्वात जलद साधन समजले जाते, आपण आपला मित्रपरिवार व आपल्या नातेवाईकांसोबत सहजपणे संपर्क साधू शकतो किंवा संदेश पाठवू शकतो. तर काही लोकांसाठी मोबाईल फोन हा मनोरंजनाचे साधनही आहे.
मोबाईलवर संगीत ऐकु शकतो किंवा प्ले गेम खेळु शकतो याव्यायतिरिक्त स्मार्टफोनसाठी नवीनतम ॲप्स वापरून आम्ही चित्रपट पाहण्यासाठी आणि सामाजिक नेटवर्कवर आमच्या प्रोफाईल तपासण्यासाठी इंटरनेटवर प्रवेश करू शकतो आणि आपण जिथे असतो तिथे अपली स्थिती अद्यतनित करू शकतो.
मोबाईलच्या माध्यमातून वेगवेगळ्या ॲप्सच्या सहाय्याने पैशाची देवाणघेवाण, ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यासाठी वापर करु शकतो तसेच आपल्या हातात एक स्मार्टफोन असेल तर, आपला अभ्यास अधिक शब्दकोष बनतो जसे की शब्दकोश शोधणे, इंटरनेटवरील बर्याच स्त्रोत संदर्भ शोधा जे अभ्यासासाठी उपयुक्त आहेत. गुगल एक अस साधन आहे की जगातील कोणत्याही प्रकारची माहिती एका क्षणात उपलब्ध होते.
यामुळे आजच्या धकाधकीच्या व प्रगत युगात मोबाईल म्हणजे भ्रमणध्वनी हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. असे असले तरी मात्र मोबाईल टॉवर कंपन्यांकडून शहरी व ग्रामीण भागातून सुविधा उपलब्ध करुन देतांना शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील नेटवर्क कडे कमालीचे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामीण भागातील मोबाईल धारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
यात विशेष बाब म्हणजे चांगल्या नामांकित कंपनीचे फाइव्ह जी मोबाईल खरेदी करुन वेगवेगळ्या कंपनीकडून सीमकार्ड घेऊन महिन्याला ठराविक रकमेचा रिचार्ज करुन घेण्यासाठी शहरातील व ग्रामीण भागातील ग्राहक हे सारखी रक्कम मोजून देतात मात्र रिचार्ज करुन घेतांना मोबाईल कंपनीकडून देण्यात येणाऱ्या सुविधा देतांना मात्र शहरातील भागातून फाइव्ह जी नेटवर्कर पूर्णपणे कार्यान्वित केलेले असल्याने शहरातील ग्राहकांना मोबाईलचा वापर करतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत.
तर दुसरीकडे फाइव्ह जी मोबाईल घेऊन त्यात हव्या त्या योग्य कंपनीचे सिमकार्ड टाकून कंपनीच्या ठरवून दिलेल्या दराप्रमाणे दरमहा रिचार्ज करुन सुध्दा ग्रामीण भागातील ग्राहकांना नेटवर्क मिळत नसल्याने मोबाईलचा वापर करणे कठीण झाले आहे. यामुळे नातलगांशी संपर्क करणे, वैद्यकीय सेवा किंवा इतर अत्यावश्यक कामे करणे, पैशांची देवाणघेवाण करणे, शाळकरी मुलांना ऑनलाईन अभ्यास करणे व इतर ऑनलाईन सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे
विशेष म्हणजे भ्रमणध्वनीरुन एकमेकांशी संवाद साधतांना पूर्णपणे नेटवर्क (रेंज) उपलब्ध होत नसल्याने संवाद साधला जात नाही. यामुळे कामे वेळेवर होत नसून समज गैरसमज निर्माण होत आहेत. ही परिस्थिती पाहता (शहरात फाइव्ह जी, ग्रामीण भागात मात्र एजी, ओजी, लोजी, सुनोजी) अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. यामुळे ग्रामीण भागातील मोबाईल ग्राहकांची आर्थिक लूट व दैनंदिन कामात अडथळा निर्माण होत आहे.