दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१२/२०२३

पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी ग्रामपंचायतीच्या सरपंचांना दोन पेक्षा जास्त अपत्ये असल्यावरही त्यांनी भोकरी ग्रामपंचायतीच्या २०२१ सार्वत्रिक निवडणुकीत निवडणुकीचे नामनिर्देशन पत्राच्या आवश्यक कागदपत्रांच्या सुची मधील रकाना क्रमांक १७ मध्ये (आपत्याबाबतचे घोषणापत्र) देतांना दोन पेक्षा जास्त अपत्य नसल्याबाबतचे घोषणापत्र सादर करुन शासनाची फसवणूक केली असल्याची तक्रार अख्तर अब्दुल रहेमान व अकिल महेमुद शेख यांनी दिनांक ११ ऑक्टोंबर २०२३ रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे केले होती. तसेच सरपंच अरमान अब्दुल काकर यांना अरसलान, अफीसा, मसीरा, जिशान अशी चार अपत्ये असल्याचे पुरावे सादर केले आहेत.

या तक्रारीची दखल घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार वरखेडी बुद्रुक भाग वरखेडी तालुका पाचोराचे मंडल अधिकारी यांनी दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी नोटीस जारी करुन सरपंच अरमान अब्दुल काकर तसेच तक्रारदार अख्तर अब्दुल रहेमान व अकिल महेमुद शेख यांना दिनांक २० नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत नोटीस बजावून नोटीस बजावल्या पासून सात दिवसांचे आत वरखेडी येथील मंडळ अधिकारी कार्यालय वरखेडी येथे उपस्थित राहून आपले म्हणणे सादर करण्यासाठी बजावले होते. तसेच सात दिवसांच्या आत सरपंच व तक्रारदार यांनी आपले म्हणणे सादर न केल्यास आपले काहीएक म्हणणे नाही असे गृहीत धरुन पुढील कारवाई करण्यात येईल असे सुचविले होते.

परंतु मंडळ अधिकारी यांनी फक्त कागदी घोडे नाचवून नोटीस बजावल्या पासून सात दिवसांचे आत कोणत्याही प्रकारची चौकशी केली नसल्याचा व आमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी दिनांक व वेळ निश्चित केली नसल्याने आम्ही तक्रारदार मंडळ अधिकारी यांना वारंवार भेटून काय कारवाई करणार किंवा काय कारवाई करण्यात आली आहे याबाबत विचारणा करुनही आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नसल्याने संबंधित अधिकारी हे कुणाच्यातरी दबावाखाली येऊन पुढील कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला असून येत्या आठ दिवसात आम्ही केलेल्या तक्रारीवरून चौकशी करुन कारवाई न केल्यास आम्ही सरपंचांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले आहे.