दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/१०/२०२३

शेंदुर्णी येथील रहिवासी अंबादास बंडू जाधव याने वडगाव आंबे ग्रामपंचायतीची कोणतीही रितसर परवानगी न घेता मागील काही वर्षांपासून वडगाव आंबे गावात गावठी डुकरे सोडली आहेत. ही गावठी डुकरे गावात दिवसभर धिंगाणा घालत असतात तसेच मजुरवर्ग शेतात कामाला निघुन गेल्यावर ही डुकरे घराच्या दरवाजाला धडक देऊन घरात घुसून घरातील धनधान्याची नासाडी करतात तसेच गावातील शेतकरी कुटुंबातील महिला आपल्या घरासमोर डाळी, कडधान्य किवा इतर शेतीमाल वाळत टाकतात तेव्हा ही डुकरे या धनधान्यावर ताव मारतात ही डुकरे एवढ्यावरच थांबत नसून गावाजवळील शेतातील ज्वारी, बाजरी, मका, कापूस, भुईमूग, उडीद, मूग, चवळी या हिरव्यागार पिकांची नासाडी करतात म्हणून या मोकाट डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी वडगाव आंबे, कोकडी तांडा व वडगाव जोगे येथील शेतकरी व रहिवाशांनी मागील तीन वर्षांपासून घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेत वारंवार मागणी केली होती.

या मागणीनुसार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डुकरांचा मालक अंबादास जाधव याला वारंवार नोटीस बजावली तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु संबंधित डुकरांचा मालक अंबादास जाधव याने वेळोवेळी खोटी आश्वासने देऊन पोलीस स्टेशन व वडगाव आंबे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीची फसवणूक केली आहे. यामुळे गावात गावठी डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने वडगाव आंबे येथे दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ गुरुवार रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत गावठी डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी विषय मांडला होता. या मागणीनुसार वडगाव आंबे ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले प्रशासकीय अधिकारी मा. श्री. धस साहेब व ग्रामविस्तार अधिकाधिक मा. श्री. म्हस्के यांनी ग्रामसभेत ठराव मंजूर करुन घेत तब्बल एक महिन्यानंतर का होईना दिनांक ०३ ऑक्टोंबर २०२३ मंगळवार रोजी अंबादास जाधव याला नोटीस बजावली आहे.

परंतु ग्रामपंचायतीच्या वतीने तब्बल एक महिना उशिराने नोटीस बजावण्यात आली असल्याने वडगाव आंबे येथील शेतकरी दिलीप जैन, मच्छिंद्र थोरात, युवराज पाटील, दिनकर गायकवाड, किसन देवरे, अशोक गायकवाड तसेच कोकडी तांडा व वडगाव जोगे येथील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले असल्याने हे शेतकरी नुकसानभरपाई मिळावी म्हणून लवकरच अंबादास जाधव याचे विरोधात तहसीलदार साहेब पाचोरा व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा नोंदवणार आहेत.

तसेच येत्या आठवड्यात वडगाव आंबे गावातील गावठी डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त न झाल्यास मा. जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.