हिट अँड रन प्रकरणी दिल्ली, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशासह देशभरातील विविध राज्यांमध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे, महाराष्ट्रामध्ये देखील हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असून दिनांक ०९ जानेवारी २०२४ मंगळवार मध्यरात्रीपासून हे आंदोलन तीव्र करून चक्काजाम करण्याचा निर्णय विविध संघटनांनी घेतला असल्याची माहिती ऑटो, टॅक्सी ट्रक, ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली आहे,

बाबा कांबळे यांनी दिल्ली जंतर, मंतर येथे आंदोलन केले तसेच पंजाब येथील आंदोलनात देखील सहभाग घेतला. तसेच देशाच्या विविध भागात दौरा करून ते ०९ जानेवारी २०२४ मंगळवार रोजी महाराष्ट्र मध्ये पोहोचत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ०९ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून हे आंदोलन अधिक तीव्र स्वरुपात करण्याचा निर्णय महाराष्ट्रमध्ये घेण्यात आला असून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस, टेम्पो सर्व प्रकारचे ड्रायव्हर चालक, मालक सहभागी होणार आहेत.

याबाबत अधिक माहिती देतांना बाबा कांबळे म्हणाले देशभरामध्ये हिट अँड रन कायद्याच्या प्रकरणी आंदोलन सुरू आहे. आंदोलन करुनही सरकार मात्र त्याच्या भुमिकेवर ठाम आहे. केंद्र सरकारने देशभरातील पंचवीस करोड ड्रायव्हर चालकांच्या संघटनांसोबत चर्चा करुन आमच्या अडीअडचणी समजून घेणे आवश्यक होते. मात्र केंद्र सरकारने आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून जोपर्यंत केंद्र सरकार आमच्याशी सकारात्मक चर्चा करुन आमच्या भावना समजून घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन लोकशाही मार्गाने शांततेत सुरु ठेवा आंदोलनात भावनेच्या भरात आपल्याकडून कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही तसेच रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या तसेच आंदोलनाला गालबोट लागेल असे वर्तन करु नका.

परंतु आंदोलनाची अधिक तीव्र व आक्रमक भुमिका मांडण्यासाठी शंभर टक्के चक्का जाम आंदोलन करुन प्रत्येक तालुक्याचे तहसील कार्यालय, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय व वार्ड कार्यालयासमोर आंदोलन करा एवढे करुनही केंद्र सरकारने आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही तर चक्का जाम आंदोलन सुरुच ठेवा असे आवाहन बाबा कांबळे यांनी महाराष्ट्रातील सर्व चालक व मालकांना केले आहे.