दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/१०/२०२३

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक रुपयात अग्रीम पिक विमा योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याने एक रुपया भरुन आपल्या शेतमालाचा पिक विमा काढून घेतला आहे. तदनंतर निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेत मालाचे अतोनात नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या २५% टक्के अग्रीम रक्कम नुकसान भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

ही २५% नुकसान भरपाई मिळवून घेण्यासाठी संबंधित पिक विमा कंपनीकडून झालेल्या नुकसानीचा ऑनलाईन पद्धतीने पंचनामा करणे गरजेचे असल्याचे सांगून या पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी गावागावात जाऊन शेतकऱ्यांना भेटून तुमच्या शेती मालाचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीत तुमच्या नावाचा समावेश आहे म्हणून शेतात जाऊन फोटो काढून पंचनामा करावा लागेल त्याशिवाय तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही असे पटवून देत शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्याठिकाणी फोटो काढून नुकसानीचा पंचनामा करुन घेत आहेत.

परंतु हा पंचनामा करुन घेतांना शेतकऱ्यांना भुलथापा मारुन तुमचे पाहिजे तेवढ्या प्रमाणात नुकसान झालेले नाही तरीही आम्ही तुम्हाला नुकसान भरपाई मिळवून देतो असे सांगून प्रत्येक शेतकऱ्यांकडून ५००/०० ते १५००/०० रुपये घेऊन शेतकऱ्यांच्या शेतात फोटो काढून शेतकऱ्यांची लुबाडणूक करत असल्याचा प्रकार काही शेतकऱ्यांनी सत्यजित न्यूज कडे संपर्क साधुन कळवला आहे. याबाबत सत्यजित न्यूज कडून लवकरच भांडाफोड केला जाणार असल्याने या पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी ज्या, ज्या शेतकऱ्यांकडून पैसे घेतले असतील अश्या शेतकऱ्यांनी ९९७५६६६५२१ या भ्रमणध्वनीवर त्वरित संपर्क साधावा म्हणजे शेतकऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या संबंधित विम कंपनीच्या प्रतिनिधींनी विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करता येईल.

आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची अश्या पध्दतीने आर्थिक लुट करणे ही बाब निंदनीय असून या प्रकाराबाबत काही शेतकऱ्यांनी आपल्या पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील व माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांचेशी संपर्क साधुन या प्रकाराची माहिती दिली असल्याचे असे खात्रीलायक वृत्त असून आज सत्यजित न्यूज कडून या गैरप्रकाराचा भांडाफोड करण्यासाठी तालुक्याचे आजी, माजी आमदार मा. प्रांताधिकारी साहेब, मा. तहसीलदार साहेब व तालुका कृषी अधिकारी साहेब यांची भेट घेऊन संबंधित पिक विमा प्रतिनिधी विरुद्ध पोलीसात तक्रार दाखल करण्यासाठी भाग पाडणार आहे.

(हा गैरप्रकार पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांसोबत घडला असून मंगळवार रोजी आंबे वडगाव येथील शेतकरी दिलीप जैन यांच्या समोरच्या एकाच शेतात अनेक शेतकऱ्यांना बोलावून घेत याच ठिकाणी सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करुन छायाचित्र काढून प्रत्येक ५००/०० ते १५००/०० रुपया प्रमाणे जवळपास ५५०००/०० हजार रुपये घेऊन संबंधित विमा कंपनी प्रतिनिधींने शेतकऱ्यांची लुबाडणूक केली आहे. विशेष म्हणजे हा गैरप्रकार करुन घेण्यासाठी गावागावातील पंटरची मदत घेतली आहे. असाच प्रकार सगळीकडे घडला असुन छायाचित्रात दिसणारा संबंधित विमा प्रतिनिधी हा शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी करत असल्याची चित्रफीत एका जागृत शेतकऱ्याच्या माध्यमातून सत्यजित न्यूज कडे प्राप्त झाली आहे.)